एडलजी यांच्या रुपाने प्रथमच भारतीय महिलेचा सन्मान : लंकेचा माजी फलंदाज अरविंद डी सिल्वा यांचाही समावेश
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये तीन दिग्गज खेळाडूंचा समावेश झाला आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, माजी महिला क्रिकेटपटू डायना एडलजी आणि श्रीलंकेचे माजी महान खेळाडू अरविंद डी सिल्वा यांना आयसीसीने सन्मानित केले आहे. विशेष म्हणजे, भारताचे अनेक खेळाडू आधीपासूनच आयसीसी हॉल ऑफ फेमचा भाग आहेत. त्यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दिग्गजांचा समावेश आहे.
आयसीसीने सोमवारी हॉल ऑफ फेममध्ये सामील केलेल्या 3 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू डायना एडलजी आणि श्रीलंकेचे अरविंद डी सिल्वा यांचा समावेश आहे. आयसीसीच्या नियमानुसार निवृत्तीच्या जवळपास 7 वर्षांनंतरच कोणत्याही माजी क्रिकेटपटूचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. विशेष म्हणजे, जवळपास तीन दशके भारतीय महिला संघाचे नेतृत्व केलेल्या डायना एडलजी यांचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. एडलजी यांच्या रुपाने प्रथमच भारतीय महिलेचा आयसीसीने सन्मान केला आहे. डावखुऱ्या फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी 54 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 109 विकेट्स त्यांनी घेतल्या आहेत. महिला क्रिकेटसाठीही हा अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी निवडीनंतर दिली.
याशिवाय, लंकेचे महान फलंदाज अरविंद डी सिल्वा यांचाही आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये समावेश करत सन्मान केला आहे. 18 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत वनडे, कसोटीत शानदार कामगिरी करत त्यांनी लंकन क्रिकेटसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये असणारे भारतीय खेळाडू
सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनू मांकड, डायना एडलजी, वीरेंद्र सेहवाग.









