चला, एकदाचे विश्वचषक स्पर्धेतील चार उपांत्य फेरीतील संघ ठरले. भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया कोलकात्याच्या ईडन गार्डनवर. एकंदरीत या विश्वचषक स्पर्धेत भारतानंतर जर कोणी चांगली कामगिरी केली असेल तर ती दक्षिण आफ्रिकेनेच. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचा संघ चांगल्या सुरुवातीनंतर त्यांचा आलेख कधी वर कधी खाली दिसत होता.
एकंदरीत प्रत्येक संघाला या स्पर्धेत 9 सामने खेळायचे होते. ज्या संघाकडून अपेक्षा होत्या ते संघ पूर्णत: फेल ठरले. उदाहरण द्यायचं झालं तर इंग्लंड, पाकिस्तान ज्यांना आपण शंभर टक्के उपांत्य फेरीत गृहीत धरत होतो. त्यातच अफगाणिस्तानने तीन दिग्गज संघांना दणका दिल्याने या विश्वचषक स्पर्धेत वेगळे चित्र बघायला मिळाले. या स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हा सामना वगळता वरूण राजाने अवकृपा केली नाही हे विशेष.
आफ्रिकेचा विचार केला तर चोकर्स म्हणून ज्यांच्यावर याआधीच शिक्का बसला आहे. या शिक्यातून ते कसे बाहेर पडतात ते बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या पराभवनंतर बरंच काही शिकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्यातच वॉर्नर आणि मिचेल मार्श हे सध्या फुल फॉर्ममध्ये असणं फार मोठी जमेची बाजू. अर्थात या दोघांकडे दुर्लक्षित करून चालता येणार नाही.
दुसरीकडे न्यूझीलंडचा विचार केला तर नऊपैकी पाच सामन्यात विजय आणि चार सामन्यात पराभव अशी त्यांची कामगिरी. परंतु आजच्या घडीला न्यूझीलंडकडे असणारे अष्टपैलू खेळाडू हाच त्यांचा खऱ्या अर्थाने मोठा आधार आहे. त्यांच्याकडे सँटनर हा हुकमाचा एक्का आहे. तो काय कामगिरी करतो हेही बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यानंतर भारताने या स्पर्धेत एकापेक्षा एक विक्रम मागे टाकले आहेत. सर्व कसं थक्क करणारी अशी कामगिरी. एकंदरीत जी अपेक्षा होती की चार बलवानच संघ उपांत्य फेरीत धडक मारतील, नेमकं तेच झालं. काही संघाकडून अपेक्षाभंग झालाय खरा, पण शेवटी हे क्रिकेट आहे. असो.
स्पर्धा अगदी अत्युच्च शिखरावर येऊन ठेपली आहे. बघायचे भारतीय संघ 2011 ची पुनरावृत्ती करतो का ते. दुसऱ्या बाजूने आफ्रिका संघ चोकर्सचा डाग पुसतो की नाही हेही बघावं लागेल. तर न्यूझीलंड विश्वचषकातील पहिलं अजिंक्यपद पटकावतो का हे बघावं लागेल. बघूया, यात कुठला संघ मानसिक दडपण झुगारात उत्तम खेळ करतो, हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. शेवटचे तीन सामने रोमहर्षक अथवा अटीतटीचे होतील, अशीच अपेक्षा चारी संघाकडून करूया.









