उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल : नागरिकांसह शेतकरी वर्गातून मागणी
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातील उचगाव, सुळगाव, तुरमुरी, बाची भागातून जवळपास चार नाले वाहत असतात. सदर नाले मार्कंडेय नदीला जाऊन मिळतात. सध्या सर्व नाले कोरडे पडले आहेत. जर मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाणी या नाल्यात उपसा करून नाले भरून ठेवले तर येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांना तसेच जवळपासच्या सर्व गावातील सार्वजनिक विहिरी व नागरिकांच्या विहिरीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यासाठी पाटबंधारे खात्याने याची त्वरित अंमलबजावणी केली तर आगामी काळात दुष्काळाचे व पाणीटंचाईचे संकट सतावणार नाही. यावर हा रामबाण उपाय आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी तातडीने सदर काम हाती घेऊन पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे. या भागातील बाची गावाशेजारून नाला वाहतो. सदर नाला या भागातील शेतवडीतून जातो. देवरवाडी, महिपाळगड भागातून येणारे पाणीसुद्धा या नाल्यात जाते व सदर नाला बाची गावाहून मार्कंडेय नदीला जाऊन मिळतो. यानंतर तुरमुरी गावाशेजारून आला आहे. तुरमुरी तसेच कोनेवाडी असा संपूर्ण भाग या नाल्याच्या अधिपत्याखाली येतो. सदर नाला पूर्ण शेतवडीत असल्याने व मार्कंडेय नदीला जाऊन मिळाल्याने हाही नाला उपयुक्त आहे. तसेच उचगाव गावाजवळून नाला जातो. सदर नालाही पूर्ण शेतवडीत आहे व मार्कंडेय नदीला मिळतो.
तर सुळगा येथील नाला बेनकनहळ्ळी, सावगाव भागातून जातो. या भागातील कल्लेहोळ, सुळगा, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, बसुर्ते, कोनेवाडी, हिंडलगा अशा सर्व गावातील नागरिकांच्या शेतवडीला व सार्वजनिक विहिरीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी हे नाले अतिशय महत्त्वाचे आहेत. सध्या मार्कंडेय नदीच्या बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडवल्याने नदी काठोकाठ भरून आहे. हेच पाणी या नाल्यांमध्ये सोडून जर या नाल्यांना बंधारे व फळ्या घालून पाणी अडवले तर या संपूर्ण भागामध्ये पाणी रब्बी हंगामातील पिकांना उपयुक्त होणार आहे. या भागामध्ये रब्बी हंगामात बटाटा, मिरची, फ्लॉवर, कोबी, ऊस याबरोबर सर्वप्रकारचा भाजीपाला अशी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. सर्व भाग सुपीक असल्याने सर्वप्रकारची पिके या भागात भरघोस येतात. यासाठी हे नाले अतिशय महत्त्वाचे आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सदर नाले कोरडे पडले आहेत. नाल्यांना जवळपास डिसेंबर अखेरपर्यंत नाल्यांना पाणी वाहत असते. मात्र पाऊसच नसल्याने सदर नाले चालूवर्षी कोरडे पडले आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम खाते व लोकप्रतिनिधींनी तातडीने यावर उपाययोजना करून सर्व नाले मार्कंडेय नदीतील पाणी उपसा करून पाणी भरून बंधारे घालावेत, अशी मागणी या भागातील शेतकरी व सर्व नागरिकांनी केली आहे.









