क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
दावणगिरी येथील जिल्हा क्रीडांगणावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक मुलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात बेंगळूरने बेळगाव जिह्याचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत संत मीरा शाळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दावणगिरी येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या सामन्यात बेळगावने म्हैसूरचा 18-15 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात बेळगावने गुलबर्गाचा 28-19 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत बेंगळूरने बेळगावच्या संत मीरा शाळेचा अटीतटीच्या लढतीत 26-25 अशा गुण फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. बेळगाव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उपविजेत्या संघात संत मीरा शाळेच्या लिंगेश नायक, अभिषेक गिरीगौडर, सिद्धार्थ वर्मा, प्रणव शहापूरकर, निशांत शेट्टी, विघ्नेश दिवटे, प्रणव चौगुले यांचा समावेश होता.
वरील संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक सी. आर. पाटील, मयुरी पिंगट, प्रशिक्षक यश पाटील, शिवकुमार सुतार यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









