राहुल के. आर. शेट्टी चषक वरिष्ठ फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
के. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित राहुल के. आर. शेट्टी चषक वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मझर युनायटेडने खानापूर युनायटेडचा, तर कॉसमॅक्सने आयबीसीटीचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. तर ब्रदर्सला फँकोने, निपाणीला सिटी स्पोर्ट्सने बरोबरीत रोखले. चार्ली, ओराम, शोएब व अबुझर यांना सामनावीराने गौरविण्यात आले.
लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टींग प्लॅनेट टर्फ फुटबॉल मैदानावर शनिवार खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मझर युनायटेडने खानापूर युनायटेडचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात 20 व्या मिनिटाला उमरच्या पासवर अबूझर बिस्तीने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 41 व्या मिनिटाला अल्तमशच्या पासवर उमरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मझर युनायटेडला मिळवून दिली. 46 व्या मिनिटाला नदीमच्या पासवर अबूझरने तिसरा गोल केला. तर 52 व्या मिनिटाला मुस्ताकच्या पासवर अल्तमशने चौथा गोल करून 4-0 ची आघाडी मिळवून दिली. 55 व्या मिनिटाला खानापूरच्या सादिकच्या पासवर रोहितने गोल करून 1-4 अशी आघाडी कमी केली. दुसऱ्या सामन्यात ब्रदर्स संघाला फँको संघाने 2-2 अशा बरोबरीत रोखले.
तिसऱ्या सामन्यात निपाणी संघाला सिटी स्पोर्ट्सने 1-1 अशा बरोबरीत रोखले. 20 व्या मिनिटाला प्रशांत अजरेकरच्या पासवर करण मानेने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 27 व्या मिनिटाला सिटी स्पोर्ट्सच्या सुदर्शनच्या पासवर जोशुआने गोल करून 1-1 अशी बरोबरी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 50 व्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. 60 व्या मिनिटाला सिटी स्पोर्ट्सच्या जोशुआने बचावफळीला चकवत डीमध्ये मुसंडी मारत वेगवान फटका गोलमुखात मारला होता. पण निपाणीचा गोलरक्षक ओम कदमने डावीकडे झुकत उत्कृष्ट चेंडू आडवला. शेवटी हा सामना 1-1 अशा बरोबरीत राहिला.
चौथ्या सामन्यात कॉसमॅक्स संघाने आयबीसीटी संघाला 2-1 असा पराभव केला. या सामन्यात 23 व्या मिनिटाला कॉसमॅक्सच्या रोहणच्या पासवर शोएबने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 40 व्या मिनिटाला कॉसमॅक्सच्या शोएबने गोल करण्याची नामी संधी दवडली. 50 व्या मिनिटाला आयबीसीटीच्या कौशिक पाटीलने मारलेला फटका कॉसमॅक्सच्या गोलरक्षक ऋषीने उत्कृष्ट अडविला. 61 व्या मिनिटाला आयबीसीटीच्या किरण चव्हाणच्या पासवर विनयने बरोबरीचा गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली. खेळ संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना आयबीसीटीचा बचावफळीतील खेळाडू चेंडू बाहेर टाकण्याच्या नादात त्याच्या पायाला चेंडूत लागून सरळ गोलमुखात शिरून कॉसमॅक्सला स्वयमचीत गोल करून दिला. त्यामुळे कॉसमॅक्सने 2-1 अशी आघाडी मिळविली. प्रसन्ना शेट्टी, सचिन फुटाणे, उमेश मजुकर, घाटगे आदी मान्यवरांच्या हस्ते चार्ली (सिटी स्पोर्ट्स), ओराम (कॉसमॅक्स), शोएब (ब्रदर्स), अबूझर (मझर युनायटेड) यांना सामनावीराने तर तेजस, किरण, आतिक व ओम कदम यांना इम्पॅक्ट खेळाडूंनी गौरविण्यात आले.
रविवारचे सामने
1) मझर युनायटेड वि. शिवाजी कॉलनी, सकाळी 12 वा. 2) बुफा वि. फँको, दुपारी 1.30 वा. 3) साईराज वि. निपाणी, दुपारी 3 वा. 4) फास्ट फॉरवर्ड वि. खानापूर युनायटेड, सायंकाळी 4.30 वा.









