उपायुक्तांनी नगरसेवकांनाच पकडले कोंडीत
बेळगाव : इमारत पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय पीआयडी क्रमांक मिळणे अशक्य झाले आहे. याबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र न घेताच पीआयडी क्रमांक द्यावा, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केली. अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी महापालिका उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी याबाबत तुम्हीच योग्य ते निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगत नगरसेवकांनाच कोंडीत पकडले. अर्थ व कर स्थायी समितीची बैठक चेअरमन वीणा विजापुरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी पीआयडी क्रमांक मिळत नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. सीसी (इमारत पूर्ण झाल्याचा दाखला) दिल्यानंतरच पीआयडी क्रमांक मिळणार आहे. याबाबत सर्वसाधारण सभेमध्येही जोरदार चर्चा झाली होती. त्यावेळी विना सीसी घरांची नोंद करून त्यांना परवानगी दिली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. त्यामुळे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सीसी दिलेल्यांनाच पीआयडी क्रमांक दिला जाईल, असे सांगितले होते.
तुम्हीच एका निर्णयावर ठाम राहा!
आता नगरसेवकांच्या जवळच्या व्यक्तींचीच कामे रखडल्याने नगरसेवकांनी पुन्हा याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा केली. आपणच चूक करायची आणि आपणच दुरुस्त करण्याचा प्रकार या बैठकीत दिसून आला. यावेळी महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी तुम्हीच एका निर्णयावर ठाम राहा, त्यानंतरच हा प्रश्न सुटू शकतो, असे हसत सांगून नगरसेवकांची पोलखोलच केली. एकप्रकारे नगरसेवकांचीच चूक त्यांनी दाखवून दिली. मात्र आम्ही कोणतीच चूक केली नाही, असे निर्बंध तुम्हीच घातला आहात, असे म्हणत अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो डाव नगरसेवकांवरच उलटला आहे.
यावेळी कायदा सल्लागार अॅड. महांतशेट्टी यांनी कायद्याची माहिती वाचून दाखविली. वास्तविक इमारत पूर्ण झाल्याचा दाखला दिल्याशिवाय पीआयडी क्रमांक देताच येत नाही, असे स्पष्ट सांगितले. त्याबाबत कायदाच आहे. यावर तुम्हीच योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. एकूणच या बैठकीमध्ये नगरसेवकांना याबाबत अधिक माहिती नसल्याचे दिसून आले. केवळ आपली कामे प्रलंबित आहेत, त्यामुळे यातून कोणता मार्ग काढायचा? यावरच चर्चा झाली. सध्या काही नगरसेवक हीच कामे घेऊन महापालिकेकडे येत आहेत. मात्र सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसारच आयुक्तांनी तो निर्णय घेतला होता. त्यावेळी सर्वांनीच सहमती दिली होती. मात्र आता आपलीच कामे अडल्यामुळे नगरसेवकांनी आपला पवित्रा बदलल्याचे दिसून आले. एकूणच या बैठकीमध्ये पोरकटपणा दिसून आला. या बैठकीला उपमहापौर रेश्मा पाटील, सत्ताधारी गटाचे नेते राजशेखर डोणी, उपायुक्त उदयकुमार तळवार, नगरसेवक शंकर पाटील, नगरसेवक हणमंत कोंगाली यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.









