वृत्तसंस्था/ चंदिगड
पंजाबचा 33 वर्षीय क्रिकेटपटू गुरुकिरात सिंग मान याने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 2016 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातून तीन वनडे सामने खेळले होते.
गुरुकिरात सिंग मान हा मध्यफळीतील फलंदाज असून त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत 10 षटके फिरकी गोलंदाजी केली होती. पंजाबच्या राष्ट्रीय संघातूनही त्याला वारंवार डच्चू देण्यात आला होता. 2011 साली त्याने राष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले होते तर पंजाब संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्याने दमदार फलंदाजीच्या जोरावर पंजाबला सी. के. नायडू चषक मिळवून दिला होता. 2015-16 च्या रणजी हंगामात त्याने पंजाब संघाकडून खेळताना द्विशतक झळकवले होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि दिल्ली कॅपिटल्स संघांचे प्रतिनिधीत्व करताना एकूण 41 सामन्यात 511 धावा जमवल्या आहेत. अलीकडेच पंजाबने सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर मानने भारतीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेत त्याला केवळ एक सामना खेळता आला होता.









