वृत्तसंस्था/ चेन्नई
2023 सालातील राष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धा चेन्नईतील नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये 21 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. बिलियर्ड्स आणि स्नूकर क्षेत्रातील 90 वी राष्ट्रीय स्पर्धा आहे. 2011 नंतर प्रथमच ही स्पर्धा चेन्नईमध्ये घेतली जात आहे.
ही स्पर्धा 25 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सदर स्पर्धेत सुमारे 1500 स्पर्धक सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा विविध वयोगटात आणि फॉरमेटमध्ये खेळवली जाणार आहे. आदित्य मेहता, रफात हबीब, विद्या पिल्ले, ब्रिजेश दमानी, श्रीकृष्ण सूर्यनारायण आणि अनुपमा रामचंद्रन हे प्रमुख स्पर्धक भाग घेणार आहेत. ही स्पर्धा वरिष्ठ पुरुष आणि महिलांच्या बिलियर्ड्स स्नूकर विभागात घेतली जाईल. त्यानंतर मास्टर्स स्नूकर, 6 रेड्स स्नूकर ही स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी त्याचप्रमाणे उपकनिष्ठ, कनिष्ठ मुले आणि मुलींच्या विभागात लढती होतील. या क्रीडा प्रकाराला इंग्लंडमध्ये अमाप प्रसिद्धी मिळत आहे. आता संपूर्ण जगामध्ये या क्रीडा प्रकाराचे आकर्षण शौकिनांना होत आहे. विविध गटातील विजेत्यांना रोखरकमेची बक्षीसे दिली जाणार असल्याची माहिती तामिळनाडू बिलियर्ड्स-स्नूकर संघटनेचे उपाध्यक्ष राजमोहन यांनी दिली आहे. बिलियर्ड्स स्नूकर या क्रीडा प्रकाराला अद्याप ऑलिम्पिक स्पर्धा मान्यता मिळालेली नाही.









