माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी धरले सीडीपीओंना धारेवर : योग्य धान्य पुरवठा करण्याच्या सूचना
खानापूर : तालुक्यातील अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येत असलेले धान्य सडलेले आणि आळ्या धरलेले आहे. याबाबत तालुक्यातील काही अंगणवाड्यांतील धान्याची जागरुक नागरिकांनी तपासणी करून सदर बाब माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत अंजली निंबाळकर यांनी अंगणवाडी अधिकाऱ्यांना धारेवर धरून पुढील काळात योग्य प्रतिचा धान्य पुरवठा करण्यात यावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. सरकारच्या एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत शहरासह ग्रामीण भागातील अंगणवाड्यांतील बालकाना शासनाकडून पोषण आहार पुरवला जातो. कुपोषण दूर व्हावे, हाच या मागचा हेतू आहे. शासनाकडून उत्तम दर्जाचे पोषण आहार पुरवणे गरजेचे आहे. असे असताना तालुक्यातील काही अंगणवाड्यांतून सडलेले, आळ्या धरलेले धान्य पुरवठा करण्यात येत आहे.
स्वच्छ करूनच मुलांना आहार देतो
पश्चिम भागातील काही अंगणवाड्यांना आळ्या झालेले धान्य पुरवठा होत असल्याचे पाहून काही गावातील जागरुक नागरिक आणि युवकांनी अंगणवाडी सेविकेला याबाबत जाब विचारला. त्यावेळी अंगणवाडी सेविकेने याच प्रकारचा धान्य पुरवठा होत असल्याने आम्ही स्वच्छ करूनच मुलांना आहार देत आहोत असे सांगितले.
उत्कृष्ट धान्य न पुरवल्यास कारवाईचा इशारा
युवकांनी सदर बाब माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी त्यांनी तातडीने खानापूर तालुका अंगणवाडी अधिकाऱ्यांना याबाबत धारेवर धरले. तसेच बालकांच्या आरोग्याशी असा खेळ केलेले अजिबात चालणार नाही. या आहाराचा परिणाम बालकांच्या आरोग्यांवर होणार असल्याने तातडीने हा आहार देणे बंद करून नव्याने चांगला व उत्तम दर्जाचा पोषण आहार पुरवण्यात यावा. जर यात सुधारणा झाली नसल्यास संबंधित बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणून कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दमही यावेळी माजी आमदार निंबाळकर यांनी दिला आहे.









