शिल्लक राहिलेल्या भातपिकाचे नुकसान : शिवारात कापून ठेवलेल्या भातपिकांवर मोठा परिणाम : कांही पिकांना उपयोगी
वार्ताहर /किणये
तालुक्यात बुधवारी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होते. पावसाअभावी शेत शिवारातील भात व अन्य पिके वाळून गेली होती. काही ठिकाणी अल्पशा प्रमाणात भातपिके पोसवून आली होती. बुधवारी झालेल्या पावसामुळे या शिल्लक राहिलेल्या भात पिकांचे नुकसान झाले आहे. मुसळधार परतीच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले होते. गेल्या दोन दिवसापासून हवामानात बदल झाला होता. बुधवारी सकाळपासूनच तालुक्याच्या सर्रास भागात परतीचा पाऊस झाला. यामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली. काही शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्याभरापासून भात कापणीला सुरुवात केली आहे. शिवारात भात कापणी करून ठेवलेले भातपीक पावसामुळे भिजले आहे. तसेच भुईमूग काढणीची कामे सुरू होती. या भूईमुग काढणीच्या कामांमध्येही व्यत्यय निर्माण झाला आहे. गेले दोन महिने पाऊस आला नाही. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. पिके सुकून गेली आहेत. मागील दीड महिन्याभरापूर्वी पाऊस झाला असता तर पिकांसाठी हा पाऊस उपयोगी ठरला असता, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्यावेळेला पाऊस हवा होता. त्यावेळेला झाला नसल्याने यंदा भाताच्या उताऱ्यात कमालीची घट होणार आहे. तर काही शेतकरी शेतात असलेल्या भाताची कापणी करून दोन चार पोती भात घरी आणण्याच्या धडपडीत होते. अशा परिस्थितीतच बुधवारी परतीचा पाऊस झाला असल्याने भात कापणीच्या कामांना ब्रेक लागला आहे.
मच्छे, पिरनवाडी, उद्यमबाग भागातील रस्त्यांवर पाणी
बुधवारी सकाळी पावसाच्या सरी बरसल्या. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. तर सायंकाळी पावसाचा जोर वाढला होता. मच्छे, पिरनवाडी, उद्यमबाग भागातील रस्त्यांवर पाणी आले होते. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे. तर बुधवारी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. भात कापणी केल्यानंतर रब्बी हंगामातील पेरणीसाठी हा पाऊस उपयोगी ठरू शकतो, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
कुद्रेमनी भागात पावसामुळे भातपिकाचे नुकसान
बुधवारी सकाळी कुद्रेमनी भागात मोठा पाऊस पडला. परिसरात तुरळकपणे भाताची कापणी सुरू झाली आहे. कापलेले भातपीक भिजून नुकसान झाले आहे. तर शिवार भागात किंवा माळरानातील भातपीक ऐन कापणीच्या भरात आहेत. पावसाने भात झडून पडझडीने नुकसान झाले आहे. भात पोसवण्याच्या दरम्यान पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भात पोसवणी चांगली झाली नाही. पावसाळा कमी झाल्याने भात पिकांवर किड व रोगराईचा प्रादुर्भाव होवून भात खराब झाल्याने यंदा भात पिकाला नुकसानीचा फटका सोसावा लागणार, अशी शेतकरी वर्गात निराशा व्यक्त होत आहे. रताळी काढणीचे काम जोरात सुरू असून सध्याचा भाव न परवडणारा असल्याची चर्चाही शेतकऱ्यांत आहे.









