बेळगावात मोर्चा : राज्य रयत मोर्चाध्यक्ष इराण्णा कडाडी यांची माहिती
खानापूर : राज्यातील सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे जाणीवपूर्वक शेतकरीविरोधी धोरण राबवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुष्कील झाले आहे. या सरकारच्या शेतकरी धोरणाच्या विरोधात भाजपच्यावतीने राज्यभरात शुक्रवार दि. 10 रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन रयत मोर्चाचे राज्याध्यक्ष इराण्णा कडाडी यांनी येथील विश्रामधामात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, महिला मोर्चाच्या अध्यक्षा धनश्री सरदेसाई, जनरल सेक्रेटरी बसवराज सानिकोप यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस सरकारवर टीका करताना इराण्णा कडाडी म्हणाले, राज्याच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून खोटी आश्वासने देवून हे सरकार सत्तेवर आले आहे. जाहीर केलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. अन्नभाग्य योजनेतून 10 किलो तांदूळ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केंद्र सरकारने देण्यात येणाऱ्या धान्यावरच जनतेला समाधान मानावे लागत आहे. गृहलक्ष्मी योजनेत महिन्याला दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र गेल्या पाच महिन्यात फक्त 1 महिन्याची रक्कम जमा झाली आहे. तसेच सुशिक्षीत युवकांना बेरोजगार भत्ता म्हणून तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यांच्याही तोंडाला पाणी पुसण्यात आले आहे. तसेच हे सरकार शेतकरी विरोधात धोरण राबवत असून गेल्या सहा महिन्यापासून राज्यात पाऊस नसल्याने मोठा दुष्काळ पडलेला असताना एकाही पालकमंत्र्याने जिल्ह्याचा दौरा करून दुष्काळाचा आढावा घेतलेला नाही. यावरुनच हे सरकार दुष्काळाबाबत कीती गंभीर आहेत. हे निदर्शनास येते, असे ते म्हणाले.









