वृत्तसंस्था/ तेल अवीव, गाझा
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात 1,400 हून अधिक इस्रायलींना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच हजारो लोक जखमी झाले असून 200 हून अधिक इस्रायली नागरिकांना हमासने ओलीस ठेवले आहे. इस्रायलने आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. दरम्यान, इस्रायली लष्कराने हमासच्या एका ‘कमांडर’ दर्जाच्या दहशतवाद्याला ठार केल्याचे वृत्त आहे. मुहसीन अबू झिना असे त्याचे नाव असून 7 ऑक्टोबर रोजी गाझा येथून इस्रायलवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यावेळी त्याने महत्त्वाची भूमिका निभावली होती.
हमासच्या शस्त्रास्त्र विभागाचा प्रमुख मुहसीन अबू झिना यांना ठार केल्याचे इस्रायलच्या सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे. हमाससाठी डिप्लोमॅटिक रॉकेट आणि शस्त्रास्त्रे तयार करण्यामागे झिना हा मास्टरमाइंड असल्याचेही सांगण्यात आले. आमचे सैनिक गाझापट्टीच्या आत हल्ले करत असून त्यात दहशतवादी मारले जात आहेत. याशिवाय हवाई हल्ल्यात हमास दहशतवाद्यांच्या वास्तूही उद्ध्वस्त होत आहेत. अशाच एका हल्ल्यात मुहसीन अबू झिना मारला गेला.
झिना याच्या नेतृत्त्वात अनेक विमाने इस्रायलवर रॉकेट हल्ल्यांसाठी पाठवण्यात आली होती. या हल्ल्यात झिनाचा प्रत्यक्ष सहभाग होता, असेही इस्रायली लष्कराने सांगितले. यापूर्वी इस्रायलकडून एक व्हिडिओही शेअर करण्यात आला असून त्यात हमासने वापरलेली शस्त्रे, ग्रेनेड, रॉकेट आणि स्फोटक बेल्ट दाखवण्यात आले आहेत.









