दुसऱ्या आठवड्यात प्रारंभ शक्य : ख्रिसमसपूर्वी सूप वाजणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आयोजित केले जाणार आहे. ते ख्रिसमसच्या आधी आटोपते घेतले जाईल, अशी माहिती संसदेच्या कार्यालयाकडून देण्यात आली. या अधिवेशनात काही महत्वाची विधेयके संमत करुन घेतली जातील, अशी शक्यता आहे.
भारतीय दंड विधान (आयपीसी), क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि भारतीय साक्षीपुरावे कायदा या तीन प्रचलिक कायद्यांच्या स्थानी नवे कायदे आणण्यात येणार आहेत. या कायद्यांचे प्रारुप बनविण्यात आले असून ते संसदीय समितीने मान्यही पेले आहे. ही विधेयके लोकसभेत यापूर्वीच मांडण्यात आली असून आता राज्यसभेतही ती सादर केली जातील. संसदेची मान्यता मिळाल्यानंतर त्यांचे कायद्यांमध्ये रुपांतर केले जाईल. ही प्रक्रिया या अधिवेशनात होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांविषयी…
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त तसेच अन्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्यांसंबंधी विधेयकही संसदेत प्रलंबित आहे. ते या अधिवेशनात धसाला लावण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा दर्जा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांच्या तोडीचा करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले असून त्याला विरोधी पक्षांचा विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हे विधेयकही आगामी हिंवाळी अधिवेशनातच संमत करुन घेण्यात येईल.









