निशिकांत दुबे यांचा दावा : ‘लोकपाल’कडून कोणतेही अधिकृत वक्तव्य नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी बुधवारी मोठा दावा केला आहे. आपल्या तक्रारीवरून लोकपालांनी ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी ट्विट करून सांगितले. त्यानंतर टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करून निशिकांत दुबे यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले. कथित अदानी कोळसा घोटाळ्याच्या तपासाबाबत दोन मुद्यांचा आधार घेत त्यांनी सीबीआय चौकशीचे स्वागत केले आहे. मात्र, सीबीआय चौकशीसंबंधी ‘लोकपाल’कडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
दुबे यांनी बुधवारी ‘एक्स’वर पोस्ट करत सीबीआय चौकशीचा दावा केला. निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच लोकपाल यांच्याकडे तक्रार करून मोईत्रा यांनी पैसे घेत संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप केला होता. लोकसभा अध्यक्षांनी निशिकांत दुबे यांची तक्रार सभागृहाच्या शिष्टाचार समितीकडे पाठवली होती. शिष्टाचार समिती या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करत आहे. मात्र, शिष्टाचार समितीचे अध्यक्ष आणि भाजप खासदार विनोदकुमार सोनकर यांनी मोईत्रा यांना वैयक्तिक प्रश्न विचारल्यानंतर बैठकीत गोंधळ झाला होता. मोईत्रा आणि बसपा खासदार दानिश अली यांच्यासह इतर विरोधी खासदारांनी 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या समितीच्या बैठकीतून वॉकआऊट केले होते.









