वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका तेल कंपनीवर सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला. अल्हाज तेल आणि वायू कंपनी असे या कंपनीचे नाव असून आता ती काही काळापुरती बंद करण्यात आली आहे.
या घटनेनंतर त्वरित मोठ्या प्रमाणावर या भागात सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या हल्ल्यात 18 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा एक अधिकारी आणि तीन सैनिक ठार झाले होते. याच भागातील तिराह येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते ठार झाले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.









