मध्यप्रदेशातील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींची घणाघाती टीका
वृत्तसंस्था / गुणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महिलांचा घोर अपमान करणारे उद्गार भर विधानसभेत काढले असूनही विरोधी पक्षांच्या आघाडीतील प्रत्येक पक्ष मूग गिळून स्वस्थ बसलेला आहे. या उद्गारांचा एका शब्दानेही निषेध या पक्षांनी केलेला नाही. यावरुन देशातील महिलांसंबंधी या आघाडीची भावना काय आहे, हे स्पष्ट होते, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
ते मध्यप्रदेशमधील गुणा येथे एका जाहीर सभेत भाषण करीत होते. मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी बिहारच्या विधानसभेत महिलांसंबंधी अश्लाघ्य उद्गार काढले होते. त्यामुळे मोठे वादंग निर्माण झाल्यानंतर त्यांनी बुधवारी सारवासारवी करत क्षमायाचनाही केली. तथापि, वादळ शमलेले नाही.
महिलांना कसा न्याय देणार?
महिलांसंबंधी इतकी घृणास्पद भावना ज्या पक्षांमध्ये आणि त्यांच्या नेत्यांमध्ये आहे, असे पक्ष सत्तेवर आल्यास ते महिलांना कसा न्याय देऊ शकतील, अशी संतप्त पृच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. केंद्रातील सरकार महिलांना अधिकाधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. महिलांसाठी अनेक लाभदायक योजना आणण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादनही त्यांनी या सभेत केले.
सौरऊर्जा योजना
भारतीय जनता पक्ष केंद्रात तिसऱ्यांना सत्तेवर आल्यानंतर व्यापक सौरऊर्जा निर्मिती योजना हाती घेणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक घरात सौरवीज उत्पादनाचे उपकरण बसविण्यात येईल. त्यामुळे अशा घरांना वीजेसाठी कोणावरही अवलंबून रहावे लागणार नाही. शिवाय या घरांमध्ये जी अतिरिक्त वीज निर्माण होईल, ती केंद्र सरकार विकत घेणार आहे. त्यामुळे या घरांसाठी ते उत्पन्नाचे एक स्थायी साधन होणार आहे, अशी घोषणा त्यांनी भाषणात केली.
मध्यप्रदेशची मोठी प्रगती
भाजपच्या 10 वर्षांच्या काळात मध्यप्रदेशची मोठी आर्थिक प्रगती झाली आहे. 10 वर्षांपूर्वी या राज्याचा अर्थसंकल्प 80 हजार कोटी रुपयांचा होता. तो आता 3 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. केंद्र सरकारने या राज्याला मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. काँग्रेसच्या काळात यापेक्षा कितीतरी कमी निधी या राज्याला दिला जात होता, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.
जे करायचे ते करा…
गरिबांसाठीच्या विनामूल्य धान्य योजनेचा कालावधी आणखी पाच वर्षांनी वाढविण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील दुर्ग येथील जाहीर सभेत केली होती. हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांना जे करायचे ते करु द्या. जे गरिबांच्या हिताचे आहे, ते मी करतच राहणार, असेही त्यांनी ठासून स्पष्ट केले. भाजपच्या कामाची पावती मतदार त्याला विजयी करुन देतील, असा विश्वासही व्यक्त पेला.
विरोधकांची आघाडी निरर्थक…
ड विरोधकांच्या आघाडीत आतापासूनच दिसत आहे मोठी बिघाडी
ड समाजातील दुर्बल, महिला यांचा खरा हितचिंतक आहे भाजपच
ड भ्रष्टाचार आणि कुव्यवस्थापन हाच काँग्रेसचा राष्ट्रीय कार्यक्रम









