कणबर्गी जमिनीबाबतच्या बुडा निविदा प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध
बेळगाव : नगर विकास प्राधिकरण (बुडा)ने निवासी योजनेसाठी नव्याने 159 एकर 20 गुंठे क्षेत्रासाठी निविदा मागविली आहे. यामध्ये कणबर्गी योजना क्र. 61 मधील क्षेत्राचा समावेश आहे. योजना क्र. 61 मधील शेतकऱ्यांनी याबाबत जाब विचारण्यासाठी बुडा कार्यालयात धाव घेतली. मात्र, बुडा आयुक्तांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. बैठकीचे कारण पुढे करून आयुक्तांनी शेतकऱ्यांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. याबाबत शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
योजना क्र. 61 मधील 25 एकर जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. असे असले तरी बुडाने निविदा मागविली आहे. या निविदा प्रक्रियेला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. शिवाय ही प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणी केली आहे. बेळगाव नगर विकास प्राधिकरणमार्फत राबविण्यात येत असलेल्या कणबर्गी येथील 159 एकर 20 गुंठे जमिनीसाठी अल्पमुदतीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यापैकी योजना क्र. 61 मधील 25 एकर जमिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. असे असतानादेखील बुडाने या जमिनीसाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी निविदा प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शविला आहे. 61 स्किममधील जमीन न्यायप्रविष्ठ असून निविदा प्रक्रिया राबविणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे बुडाने प्रक्रिया मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.
योजना क्र. 61 मधील 25 एकर जमिनीबाबत शेतकऱ्यांनी बुडा कार्यालय गाठले. मात्र, त्याठिकाणी शेतकरी एकत्रित येताच आयुक्तांनी तेथून पळ काढला. शेतकऱ्यांना चर्चा करण्यासाठी बसविण्यात आले. मात्र, आयुक्त शेतकऱ्यांना न भेटताच परस्पर निघून गेले. शेतकऱ्यांची बाजू ऐकून न घेताच आयुक्त निघून गेल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आयुक्त चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवत असल्याचा आरोपदेखील शेतकऱ्यांनी केला आहे. या निविदा प्रक्रियेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. कणबर्गी निवासी योजनेसाठी बुडाकडून सातत्याने निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. दरम्यान 159 एकर 20 गुंठ्यांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर या प्रक्रियेसाठी कोणता ठेकेदार पुढे आला आहे, हे देखील समजणार आहे.









