सभाध्यक्ष यू. टी. खादर यांची अधिकाऱ्यांना सूचना : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक
बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाग घेणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांना योग्य राहण्याची व्यवस्था, जेवण आणि वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. याबरोबरच विधिमंडळ सभागृह सुरळीत चालण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे विधानसभा सभाध्यक्ष यू. टी. खादर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णविधानसौध येथील सभागृहामध्ये मंगळवारी अधिकाऱ्यांच्या व विविध समिती प्रमुखांच्या पूर्वतयारी बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे म्हणाले, अधिवेशन काळात कोणत्याच प्रकारची अव्यवस्था जाणवू नये यासाठी पूर्व खबरदारी घेण्यात यावी. कोणतीही समस्या असल्यास अथवा अतिरिक्त व्यवस्था आवश्यक असल्यास आपल्या अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांवर तसेच समितींवर सोपविलेली जबाबदारी सुरळीत पार पाडावी.
मंत्री, आमदार, अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, महनीय व्यक्ती, हजारो व्यक्ती या अधिवेशनाला येणार आहेत. त्यामुळे दर्जेदार जेवण, वसती आणि वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. अधिवेशनानिमित्त हॉटेल बुकिंग करण्यात आली आहेत. दरम्यान, विवाह समारंभानाही लवकरच सुरुवात होत असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील हॉटेलांमध्ये नागरिकांसाठी 10 टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात. हॉटेल मालकांना व नागरिकांना याची माहिती देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी प्रमाणेच वसती व जेवण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था पुढेही कायम ठेवावी. अधिवेशन काळात आवश्यक असणारी कागदपत्रे, मुद्रण व्यवस्था आदींची व्यवस्था करून ठेवण्यात यावी. तत्काळ वैद्यकीय सुविधा तैनात ठेवण्यात यावी. सेल्फी स्टॉल उभारण्यात यावेत. अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हा एक संस्मरणीय क्षण असणार आहे. याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, असे सभाध्यक्ष यू. टी. खादर यांनी सांगितले.
सुवर्णसौधसमोरील उद्यानाचा विकास करा
अधिवेशन काळात विधानसभेच्या आवारामध्ये वाहनचालक इतर कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. गरज पडल्यास कूपन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, असे सभापती बसवराज होरट्टी यांनी सांगितले. सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना बसव्यवस्था तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांना विधानसौधमध्ये येण्यासाठी सोय करून देण्यात यावी, असे अधिकाऱ्यांना त्यांनी सूचित केले. सुवर्णसौधसमोरील उद्यानाचा विकास करण्यात यावा. बागायत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. सध्या अनुमोदन दिलेल्या उद्यानाच्या कामाला त्वरितगतीने प्रारंभ करण्यात यावा, आठवड्याभरात त्याचा अहवाल द्यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर डिसेंबरमध्ये विवाह समारंभ असल्याने काही वसतिगृहांमध्ये नागरिकांसाठी काही प्रमाणात खोल्या आरक्षित ठेवण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. विधानसौध वसतिगृह यासह आवश्यक ठिकाणी वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका नियोजित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. पोलिसांसाठी वसतिगृहासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. 22 ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सांगितले. यावेळी विधान परिषद कार्यदर्शी महालक्ष्मी विशलाक्षी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते.









