आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नांना यश
खानापूर : खानापूर तालुक्यातील चार शाळांच्या वर्गखोली बांधण्यासाठी 50 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वायव्य शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. मलनाड अभिवृद्धी मंडळाकडून हा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. तालुक्यातील अनेक शाळांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक शाळांच्या खोल्या मोडकळीस आल्या आहेत. याबाबतचा अहवाल आमदार प्रकाश हुक्केरी यांना दिला होता. याबाबत त्यांनी पाठपुरावा करून तालुक्यातील चार शाळांसाठी 50 लाखाचा निधी मंजूर करून घेतला आहे.
यामध्ये कणकुंबी येथील माउली विद्यालयाच्या वर्गखोलीसाठी 10 लाख. बिडी येथील ग्रुप एज्युकेशन संस्थेच्या शाळा खोलीसाठी 12 लाख 50 हजार, बैलूर येथील संभाजी हायस्कूलच्या वर्गखोलीसाठी 12 लाख 50 हजार, तर गर्लगुंजी येथील म. ज्योतिराव फुले विद्यालयासाठी 15 लाखाचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचे पत्र तालुका व जि. पं. अभियंत्यांना दिले असून जि. पं.च्या अभियंत्यांनी संबंधित शाळांना भेट देऊन आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात या खोल्यांचे बांधकाम सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील शाळांना आणखी मोठा निधी मंजूर करण्याची विनंती केली आहे. याबाबत आमदार प्रकाश हुक्केरी यांनी सकारात्मकता दर्शविली असून खानापूर तालुक्यासाठी जे काही करता येणे शक्य आहे. ते आपण निश्चित करू, असे आश्वासन दिले आहे.









