बेळगाव ; आनंद क्रिकेट अकादमी आयोजित चौगुले चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी सेंट झेवियर्स संघाने केंद्रीय विद्यालय संघाचा तर सेंटपॉल्सने केएलई बी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. इंद्रकुमार प्रजापती व अथर्व करडी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावरती आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मिथुन शास्त्राr वीरेश गौडर, हेमंत यादव, आनंद करडी आदी मान्यवरांच्याहस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत सेंटपॉल्स, सेंट मेरीज, सेंट झेवियर्स, भरतेश, केएलई अ, केएलई ब, ज्ञानप्रबोधन मंदिर, केंद्रीय विद्यालय या संघाने सहभाग घेतला आहे. उद्घाटन सामन्यात केंद्रीय विद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडीबाद 103 धावा केल्या.
त्यात गौतमने 2 चौकारासह 28, तर पवन तलवारने 14 धावा केल्या. झेवियर्सतर्फे इंद्रकुमार प्रजापती व विराज येळ्ळूरकर यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना झेवियर्सने 20 षटकात 5 गडीबाद 104 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात आरूषने 5 चौकारसह 26, अनुज 2 चौकारासह 16 धावा केल्या. केव्हीतर्फे निखीलने 1 गडीबाद केला. दुसऱ्या सामन्यात सेंटपॉल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 गडीबाद 118 धावा केल्या. त्यात अथर्व करडीने 2 चौकारासह 45, सोमेश चौगुलेने 14 धावा केल्या. केएलईतर्फे रोहन प्रसन्नाने 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलई ब संघाचा डाव 20 षटकात सर्व गडीबाद 75 धावात आटोपला. त्यात कौस्तुभ पाटीलने 4 चौकारासह 39, अर्नव यादवने 2 चौकारासह 21 धावा केल्या. सेंटपॉल्सतर्फे सुरज सक्रीने 5, अथर्व करडीने 1 गडीबाद केला.









