वृत्तसंस्था / बालासोर
भूमीवरुन भूमीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या भारतनिर्मित ‘प्रलय’ या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. हे लघुपल्ल्याचे क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला 350 ते 500 किलोमीटर इतका आहे. त्यावरुन 500 ते 1,000 किलो इतका दारुगोळा वाहून नेला जाऊ शकतो. या क्षेपणास्त्राची अचूकता सिद्ध झालेली असून लवकरचे ते भारतीय सेनेत समाविष्ट होणार आहे.
या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) करण्यात आली आहे. सीमावर्ती क्षेत्राच्या संरक्षणासाठी त्याची विशेषत्वाने निर्मिती करण्यात आली आहे. लवकरच त्याचे उत्पादन पेले जाणार असून ते चीन आणि पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमांवर बसविले जाईल.
परीक्षण यशस्वी
मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ओडिशा राज्याच्या बालासोर प्रक्षेपण केंद्रावरुन या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. त्याच्या प्रवासावर ट्रॅकिंग यंत्रणेद्वारे लक्ष ठेवण्यात आले. या क्षेपणास्त्राने त्याच्याकडून असणाऱ्या सर्व अपेक्षा व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती नंतर देण्यात आली.
चीनच्या तोडीस तोड
चीनच्या ‘डोंग फेंग 12’ या क्षेपणास्त्राच्या तोडीस तोड प्रलय क्षेपणास्त्र आहे. तसेच रशियाच्या ‘इस्कंदर’ या क्षेपणास्त्राइतके ते प्रभावी आहे. रशियाने इस्कंदर या क्षेपणास्त्राचा उपयोग प्रभावीपणे युक्रेन युद्धात केला आहे. पूर्णत: भारतीय निर्मितीचे असणारे ‘प्रलय’ हे क्षेपणास्त्र हे डीआरडीओचे मोठे यश मानले जात आहे.









