सागरी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवण समुद्रात उभारलेल्या कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग किल्ल्यावर 4 डिसेंबरला भारतीय नौसेना दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या नौसेना दिनामध्ये सुमारे 70 जहाजे सहभागी होणार आहेत. नौसेना दिनाच्या निमित्ताने मालवणमधील सर्जेकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळाही उभारण्यात येत आहे. हा नौसेना दिन अभूतपूर्व होण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे कोकणच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार यावर्षीचा भारतीय नौसेना दिन 4 डिसेंबरला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. याची पूर्व तयारी मागील चार महिन्यांपासून सुरू आहे. कोकणच्या किनारपट्टीवर पहिल्यांदाच नौसेना दिन साजरा होणार असल्याने सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घालत भारतीय नौसेना दिन भव्य-दिव्य होण्यासाठी खास बैठका घेऊन लागेल तेवढा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे नौसेना दिन अभूतपूर्व ठरण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. नौसेना दिनात नौदलाची सुमारे 70 जहाजे सहभागी होणार आहेत. त्यामुळे या अभूतपूर्व सोहळ्यात भारतीय नौसेनेचे सामर्थ्य अनुभवता येणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाच्या आय. एन. एस.-जमुना या जहाजामार्फत मालवणच्या खोल समुद्रात जल सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात उभारलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचे नेहमीच पर्यटकांना आकर्षण असते. चारही बाजूंनी समुद्र, किल्ल्याच्या तटबंदीला धडकणाऱ्या उंचच उंच लाटा आणि किल्ल्यामध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील एकमेव मंदीर, गोड्या पाण्याची विहिर, लोकवस्ती या सर्व गोष्टींमुळे दरवर्षी लाखो पर्यटक सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत असतात. याच ठिकाणी आता भारतीय नौसेना दिन साजरा केला जात असल्याने सिंधुदुर्गच नव्हे, तर समस्त कोकणवासीयांसाठी ही अभिमानाची बाब ठरणार आहे.
नौसेना दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार मालवण समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे. नौदलाच्या मार्गदर्शनाखाली शिवपुतळा परिसरात तटबंदीही उभारण्यात येत आहे. यासाठी पाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे नौसेना दिन कार्यक्रमात नौसेनेच्या सामर्थ्याचा अनुभव घेता येणार आहे. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व राजकोट किल्ला परिसर सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. नौसेनेतर्फे गडकोटांच्या माळेतील राजकोट येथे शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. छोटेखानी राजकोटचे सुशोभिकरण करतानाच त्याला किल्ल्याचे स्वरुप देण्यात येणार आहे. पाच कोटी रुपये खर्चाच्या पुतळा परिसरात तटबंदीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी चौथऱ्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. पुतळ्यासभोवती किल्ल्याप्रमाणे तटबंदी उभारण्यात येत आहे. 600 फूट लांबीच्या तटबंदीचे काम पूर्ण झाले आहे. यात सहा बुरुजांचा समावेश असून तटबंदीची उंची आठ फूट आहे. प्रवेशद्वाराचे कामही हाती घेण्यात आले आहे. किल्ल्यात रंगरंगोटी, पथदीप व आतील मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कल्याण येथील शिल्पकार जयदीप आपटे यांनी तयार केला आहे. हा पुतळा ब्रॉन्झ धातूपासून बनविलेला असून दोन महिन्यांत तो बनविण्यात आला आहे. सिंधुदुर्ग किल्याच्या दिशेने पाहत असलेला व हातात तलवार असलेला शिवरायांचा हा पुतळा सुमारे 35 फूट ऊंच असणार आहे. शिवरायांच्या पुतळ्यामुळे राजकोट किल्ल्याचे पुनरुज्जीवन होऊन ऐतिहासिक गतवैभव प्राप्त होणार आहे.
राजकोट किल्ला येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी 34 गड किल्ल्यांची माती गोळा करून त्या ठिकाणी आणण्यात आली व शिवपुतळा उभारणीच्या ठिकाणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भव्यदिव्य स्वरुपात भूमिपूजन सोहळाही पार पडला आहे. तसेच नौसेना दिनाच्या निमित्ताने मालवण तारकर्ली परिसर, राजकोट किल्ला परिसर यांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कोकणच्या किनारपट्टीवरील सुप्रसिद्ध तारकर्ली पर्यटन स्थळ व सिंधुदुर्ग fिकल्ल्याला झळाळी निर्माण झाली आहे.
भारतीय नौसेना दिनाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 4 डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्यात भारतीय नौसेनेचे सामर्थ्य सर्वांना अनुभवता येणार आहे. नौसेना दिनापूर्वी नौदलामार्फत तारकर्ली समुद्रात रंगीत तालीम घेण्यात येत आहे. याकरिता तारकर्लीसमोरील सहा ते आठ वाव पाण्यात नौदलामार्फत नऊ ठिकाणी बोया बसविण्यात येत आहेत. त्यामुळे मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांनी बोया बसविण्यात आलेल्या ठिकाणांपासून दूर नौकानयन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नौसेना दिन अतिशय शानदार पद्धतीने साजरा होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी तयारी जिल्हा प्रशासन, नौदलामार्फत युद्धपातळीवर सुरू आहे.
भारतीय नौसेना दिनात नौदलाची सुमारे 70 जहाजे सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या आयएनएस-जमुना जहाजामार्फत सर्जेकोट ते देवबाग समुद्रात जलसर्व्हेक्षण करण्यात आले आहे. नौदलाच्या जहाजांच्या नांगरणीच्या जागाही निश्चित करण्यासाठी सर्व्हे करण्यात आला आहे. नौसेना दिनासाठी तारकर्ली समुद्र किनारी भव्य शामियाना उभारला जाणार असून तेथील व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
मंत्रालयीन पातळीवरील वरिष्ठ अधिकारी, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष घालत आहेत. कोणत्याही उणिवा राहू नयेत, यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाणही लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर येणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेतही उणीव राहू नये, यासाठी पोलीस यंत्रणाही आतापासूनच कामाला लागली आहे.
ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली समुद्र किनारा, राजकोट किल्ला हे पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहेत. मात्र भारतीय नौसेना दिनाच्या निमित्ताने कोकण किनारपट्टी जगाचे लक्ष वेधून घेणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे. त्याचप्रमाणे अभूतपूर्व ठरणाऱ्या नौसेना दिनाच्या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून संबोधित करताना कोकणच्या विकासासाठी काही घोषणा करून विशेष भेट देतील, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
संदीप गावडे








