शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णयाची अंमलबजावणी
बेळगाव : शेतकऱ्यांच्या हितासाठी मलप्रभा जलाशयातून उजवा कालवा व नरगुंद शाखा कालवा आणि सिंगारकोप्प उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यातून 7 नोव्हेंबरपासून 1 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मलप्रभा पाणी योजना सल्लागार समितीच्या अध्यक्षा, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे साहजीकच पाणीटंचाई भासते आहे. भविष्यात पिकांना तर सोडाच, पिण्याच्या पाण्याचीही समस्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. तरीही शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन 1 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिण्यासाठी व पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. या बैठकीत बोलताना सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य म्हणाले, दुष्काळामुळे मलप्रभा जलाशयातून हुबळी-धारवाडसह इतर शहरांना 24 तास ऐवजी चार दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी पुरवठ्याचा निर्णय घ्यावा. यावेळी नवलगुंदचे आमदार एन. एच. कोनरे•ाr, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर, जिल्हाधिकारी नितेश पाटील, मुख्य अभियंते अशोक वासनद, सल्लागार समितीचे सदस्य सचिव व अधीक्षक अभियंते व्ही. एस. मधुकर आदी उपस्थित होते.









