चन्नम्मा चौकात जलवाहिनीला गळती : रिक्षाचालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
बेळगाव : पावसाअभावी यंदा शहराला पाणीपुरवठा करणारे जलाशय क्षमतेनुसार भरले नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून आतापासूनच काटकसर केली जात आहे. असे असताना येथील चन्नम्मा चौकाजवळील रिक्षा स्टँडजवळ गेल्या तीन महिन्यांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्याचे रिक्षाचालकांकडून सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालय आवारामध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम सुरू असताना नवीन यंत्रणा उभारण्यात आली आहे. या दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या आवार भिंतीजवळून गेलेल्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ही गळती गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. याकडे पाणीपुरवठा करणाऱ्या मंडळाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.
याबाबत रिक्षाचालकांनी पाणीपुरवठा करणाऱ्या विभागाला माहिती देऊनही जलवाहिनीची गळती रोखण्यात आलेली नाही. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे जवळपास लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे रिक्षाचालकांतून सांगण्यात येत आहे. याबाबत या भागातील नगरसेवकालाही माहिती देण्यात आली आहे. नगरसेवकांनी संबंधित विभागाला माहिती दिली आहे. मात्र, याची दखल घेण्यात आली नसल्याचे रिक्षाचालकातून सांगण्यात येत आहे. सतत वाहणारे पाणी पाहून जवळच असणाऱ्या स्वच्छतागृह चालकाने त्यामध्ये लहानशी मोटर बसवून पाण्याचा वापर सुरू केला आहे. जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी जात असले तरी ते दिसून येत नाही. सदर पदपथाखालून वाहून गटारीत जात आहे. त्यामुळे वाया जाणारे पाणी दिसून येत नाही. एकीकडे शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असताना निर्माण झालेल्या गळतीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाणीपुरवठा मंडळाने तातडीने दखल घेऊन वाया जाणारे पाणी रोखावे, अशी मागणी रिक्षाचालकांतून केली जात आहे.









