बेळगाव : के. आर. शेट्टी लायाज क्रिकेट अकादमी आयोजित मदर इंडिया चषक 12 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातील निना स्पोर्टस संघाने लायाज क्रिकेट अकादमीचा 42 धावानी, एसकेईने अर्जुन स्पोर्टसचा 8 गड्यांनी युनियन जिमखाना ब ने निपाणीचा जिमखाना अ ने बेळगाव स्पोर्टस क्लबचा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. कृष्णा पिसे, दक्ष शेरीगार, राघव, हमजा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मदर इंडिया चषक 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात निना स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 गडीबाद 165 धावा केल्या. त्यात कृष्णा पिसेने 70, महम्मद झियानने 59 धावा केल्या. लायाजतर्फे वेदराज पाटीलने 3, स्वयम खोतने 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना लायाज अकादमीने 25 षटकात 5 गडीबाद 122 धावाच केल्या. त्यात कौशिक बेनकट्टीने 38, खांडू पाटीलने 48 धावा केल्या, निनातर्फे झियानने 3, अन्वरने 2 गडीबाद केले. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 4 गडीबाद 158 धावा केल्या. त्यात अर्जुन लमाणीने 38, अभिषेक एम. ने 28 धावा केल्या.
एसकेईतर्फे विहान व यश यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेईनी 21.5 षटकात 2 गडीबाद 160 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला त्यात दक्ष शिरेगारने 64, पुनीत हुलमनीने 36 धावा केल्या. अर्जुनतर्फे अभिषेकने 2 गडीबाद केल्या. तिसऱ्या सामन्यात युनियन जिमखाना ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 4 गडीबाद 189 धावा केल्या. त्यात राघव .व्ही ने 58, निखिल राठोड व स्वराज हुलजीने प्रत्येकी 16 धावा केल्या. निपाणीतर्फे माहेश्वर पाटील व ऐश्वर्या यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना निपाणी संघाने 25 षटकात 9 गडीबाद 116 धावाच केल्या. त्यात अभिषेक वडगावकरने 26, हषजीत बोकडेने 19 धावा केल्या. जिमखानातर्फे निखिल राठोडने 3, राघवने 2 गडीबाद केले. चौथ्या सामन्यात बेळगाव स्पोर्टस क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडीबाद 103 धावा केल्या. त्यात दृष्य रायकरने 43, सचिन तलवारने 12 धावा केल्या. जिमखानातर्फे सलमान धारवाडकर व सुहास यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना जिमखाना संघाने 16.5 षटकात 3 गडीबाद 104 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात महम्मद हमजाने 44, एम.डी. अब्बासने 25 धावा केल्या. बीएससीतर्फे कलमेश वेर्णेकरने 2, अल्तमशने 1 गडीबाद केला.









