वृत्तसंस्था/ सावो पावलो
सावो पावलो ग्रां प्रि या फॉर्म्युला वन शर्यतीत रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने जेतेपद पटकावले. या मोसमातील ही 21 वी शर्यत असून व्हर्स्टापेनने विक्रमी 17 वे जेतेपद पटकावले. दुसऱ्या स्थानासाठी मॅक्लारेनचा लँडो नॉरिस व अॅस्टन मार्टिनचा फर्नांडो अलोन्सो यांच्यात जोरदार चुरस झाली. पण नॉरिसला दुसरे व अलोन्सोला तिसरे स्थान मिळाले.
रेड बुलच्याच सर्जिओ पेरेझने चौथे, अॅस्टन मार्टिनच्या लान्स स्ट्रोलने पाचवे, फेरारीच्या कार्लोस सेन्झने सहावे, अल्पाईनच्या पियरे गॅसलीने सातवे, मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने आठवे, अल्फा टॉरीच्या युकी त्सुनोदाने नववे व अल्पाईच्या एस्टेबन ओकॉनने शेवटचे दहावे स्थान मिळवित एक गुण घेतला. फेरारीचा चार्लस लेक्लर्कची गाडी सातव्या वळणावर स्पिन झाल्याने त्याला बाहेर पडावे लागले.









