विजयवाडा:
आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथील बसस्थानकावर एक बस प्लॅटफॉर्मला धडकली आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची तर जखमींना उत्तम उपचार मिळवून देण्याची घोषणा केली आहे. या दुर्घटनेत एक 18 महिन्यांची मुलगी जखमी झाली होती, तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते, जेथे तिने अखेरचा श्वास घेतला आहे. बस मागे घेत असताना चालकाचे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा दावा क्षेत्रीय व्यवस्थापक एम. येसु दानम यांनी केला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी शोकाकुल कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करत जखमींना चांगले उपचार मिळवून देण्याचा निर्देश अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत पोलिसांनी तपासास प्रारंभ केला आहे. विजयवाडा बसस्थानक हे आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही तेलगू भाषिक राज्यांसाठी प्रमुख कनेक्शन पॉइंट आहे.









