दर 10 मिनिटाला एकजण दगावत असल्याचा गाझाचा आरोप : रविवारी पहाटेच्या हल्ल्यात 40 जणांचा बळी
► वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलच्या हल्ल्यात दर 10 मिनिटांनी एक बालक मृत होत असून दोन जखमी होत आहेत, असा आरोप हमासद्वारे चालवल्या जाणाऱ्या गाझा आरोग्य मंत्रालयाच्या आपत्कालीन वैद्यकीय केंद्राने केला आहे. इस्रायलने गाझावर हल्ला सुरू केल्यापासून 3,900 मुलांचा मृत्यू झाला असून 8,067 जखमी झाले आहेत, असे आपत्कालीन केंद्राचे संचालक मोअतासेम सलाह यांनी रविवारी एका निवेदनात जाहीर केले. 1,250 मुले अजूनही बेपत्ता आहेत. इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 70 टक्के मुले, महिला आणि वृद्ध असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यापासून इस्रायल गाझावर बॉम्बफेक करत आहे. हमासच्या हल्ल्यात 1,400 लोक मारले गेले असून किमान 239 लोकांना ओलीस ठेवल्याची माहिती आतापर्यंत पुढे आली आहे. दुसरीकडे, इस्रायली युद्ध विमानांनी रविवारी पहाटे गाझापट्टीतील निर्वासितांच्या छावणीवर हल्ला केला, ज्यात किमान 40 लोक ठार झाले आणि अनेक जखमी झाल्याचे गाझा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांना दिलासा देण्यासाठी अमेरिकेने इस्रायलला काही काळ हल्ले थांबवण्याचे आवाहन केले होते, परंतु गाझामधील हमासच्या सत्ताधाऱ्यांना चिरडण्यासाठी आपले हल्ले सुरूच राहतील, असे इस्रायलचे म्हणणे आहे. हजारो पॅलेस्टिनी समर्थक लोकांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, फ्रान्सची राजधानी पॅरिस, जर्मनीची राजधानी बर्लिन आणि इतर युरोपियन शहरांमध्ये निदर्शने केली आणि गाझामध्ये इस्रायली बॉम्बफेक थांबवण्याची मागणी केली. मात्र, इस्रायलने हमासचा पूर्णपणे नायनाट करण्याच्या उद्देशाने हल्ले सुरूच ठेवले आहेत.
गाझापट्टीत आता इस्रायलची सेना खोलवर घुसली आहे. हमासच्या अनेक इमारती या सेनेकडून उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. अनेक दहशतवादीही मारले गेले आहेत. रणगाडे आणि विशेष बुलडोझरच्या साहाय्याने लष्कराची जमिनीवरील कारवाई सुरु आहे. या कारवाईत इस्रायलचीही काही प्रमाणात हानी होत आहे.
जेनिन शहरावर हल्ला
गाझापट्टीत घुसलेल्या इस्रायली सेनेने नजीकच्या जेनिन या पॅलेस्टाईनी शहरावर हल्ला केला असून दोन हमास अधिकाऱ्यांना ठार केले. या शहरावर लवकरच इस्रायल ताबा मिळविण्याच्या पवित्र्यात आहे. गाझा शहरही या देशाकडून चारी बाजूंनी कोंडले असून त्याचीही शरणागती होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. काही रस्त्यांवर इस्रायलचे सैनिक आणि दहशतवादी यांच्यात उघड संघर्ष होत असून दहशतवाद्यांची जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
भुयारे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा
गाझापट्टीत हमासचे मोठे भुयारांचे जाळे आहे. ही भुयारे दहशतवाद्यांची आश्रयस्थाने आहेत. त्यांच्या आधारे हे दहशतवादी हल्ला करतात. त्यामुळे इस्रायलाच्या सेनेने ही भुयारे नष्ट करण्याचे अभियान हाती घेतले आहे. आतापर्यंत 100 हून अधिक भुयारे उडविण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.









