महुआ मोईत्रा यांच्यासंबंधी अहवालावर चर्चा होणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील ‘पैशाच्या बदल्यात प्रश्न विचारल्या’च्या आरोपांची चौकशी करणाऱ्या लोकसभेच्या शिष्टाचार समितीची महत्त्वाची बैठक मंगळवार, 7 नोव्हेंबरला होणार आहे. यादरम्यान अहवालाचा मसुदा स्वीकारण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे समजते. भाजप खासदार विनोदकुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला तपास पूर्ण केला असून आता ती आपल्या शिफारसी करेल, असा अर्थ लावला जात आहे. यापूर्वी या समितीची बैठक 2 नोव्हेंबरला झाली होती. या समितीमध्ये 15 सदस्य असून यातील बहुतांश भाजपचे आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या वर्तनावर समिती गंभीरपणे विचार करू शकते. विशेषत: गेल्या बैठकीत त्यांनी सोनकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोनकर यांनी मोईत्रा यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. शिष्टाचार समितीत समाविष्ट असलेल्या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मोईत्रा यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. 2 नोव्हेंबरच्या सभेत गदारोळ झाल्यानंतर ते बाहेर पडले. समितीच्या 11 पैकी पाच उपस्थित सदस्यांनी अध्यक्षांच्या वागणुकीचा निषेध करत सभात्याग केला होता. मात्र, आता मंगळवारच्या बैठकीतील सहभागाबाबत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
महुआ मोईत्रा यांच्यावर उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ते प्रकरण शिष्टाचार समितीकडे पाठवले होते.









