7 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार असून मिझो नॅशनल फ्रंट, झोराम पीपल्स मुव्हमेंट यांच्यासह काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली आहे. तीन पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारावर जोर दिला आहे. याच तीन पक्षांच्या प्रमुखांना यंदा मुख्यमंत्री पद विराजमान होण्याची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री पदासाठी या राज्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री मिझो नॅशनल फ्रंटचे नेते आहेत झोरामथांगा. हे मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा इच्छुक आहेत. पक्षाला निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळते का? यावरच त्यांचे मुख्यमंत्रीपद निश्चित होणार आहे. तर काँग्रेस या निवडणुकीत पुन्हा जोमाने उतरले असून त्यांच्या पक्षातर्फे लालसवता हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार मानले जात आहेत. या राज्यामध्ये अस्तित्वासाठी झटणाऱ्या झोराम पीपल्स मुव्हमेंट या पक्षाचे नेते ललदुहोमा हे देखील पक्षाने बहुमत मिळवल्यास मुख्यमंत्री बनू शकतात.
मिझो नॅशनल फ्रंटला मागच्या निवडणुकीत भाजपने सहकार्य केले होते. पण अलीकडेच मिझो नॅशनल फ्रंटचे झोरामथांगा यांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजपला यावेळेला आपले धोरण बदलावे लागते आहे. याचाच फायदा काँग्रेसचे नवे अध्यक्ष लालसवता यंदाच्या निवडणुकीत उठविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
झोरामथांगांचा परिचय….
एकेकाळी अतिरेकी नेते असणाऱ्या झोरामथांगा 1987 मध्ये मिझोरम राज्याची स्थापना झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात प्रवेश मिळवला. कॉलेज काळापासून ते मिझो चळवळीमध्ये सहभागी होत होते. एकेकाळचे नेते लालदेंगा यांचे ते खास समर्थक म्हणून ओळखले जात होते. 1990 मध्ये लालदेंगा यांच्या मृत्यूनंतर मिझो नॅशनल फ्रंटची जबाबदारी झोरामथांगा यांनी स्वीकारली. त्यानंतर सहावेळा ते राज्य विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले असून तीनवेळा मुख्यमंत्रीपदही अनुभवले आहे. ख्रिश्चन समुदायाचा पाठिंबा यांना लाभतो आहे. या समाजाचे मतदार राज्यात अधिक संख्येने आहेत.
अलीकडच्या काळामध्ये भाजप नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या सहकार्याविना राज्यात निवडणूक लढविण्याचा निर्धार झोरामथांगा यांनी केला आहे. भाजपच्या हिंदुत्व अजेंड्याबाबत झोरामथांगा नाराजी व्यक्त करतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये काँग्रेस विरोधासाठी आपण सामील झालो होतो असे झोरामथांगा यांनी म्हटले होते. मणिपूर आणि म्यानमार येथून आलेल्या शरणार्थीना झोरामथांगा यांनी संरक्षण दिले होते. या पाठबळावरच यंदाही यांनाच मतदार मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भाजपने मात्र झोरामथांगा यांचे सरकार भ्रष्टाचारी आणि न पूर्ण होणाऱ्या घोषणा करणारे सरकार असा आरोप केला आहे. तर काँग्रेसने भाजप आणि आरएसएसला मिझोरममध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या झोरामथांगा यांचा निषेध केला आहे.
लालसवतांचा परिचय….

लालसवता हे ललथनवाला यांच्या निवृत्तीनंतर राज्यातील काँग्रेसचे अध्यक्ष बनले आहेत. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद ललथनवाला यांनी राज्यामध्ये उपभोगले होते. 2018 च्या निवडणुकीत ललथनवाला यांना दोन मतदारसंघांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. या खेपेला तीन वेळचे आमदार लालसवता यांना राज्याचे अध्यक्षपद देण्यात आले. ते ऐझवाल पश्चिम 3 मधून निवडणूक लढविणार आहेत. माजी वित्तमंत्री असताना चांगली स्वच्छ कारकीर्द राबविण्याचा शिक्का त्यांच्यावर आहे. काँग्रेसने 2018 च्या निवडणुकीत केवळ पाचच जागांवर विजय मिळविला होता. पण 2013 च्या निवडणुकीत मात्र 34 जागांवर काँग्रेसने विजय मिळवून सरकार स्थापन केले होते. ललथनवाला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असले तरी म्हणावे तितके अनुभवी मात्र नाहीत. पण स्वच्छ प्रतिमा आणि युवा नेतृत्व या बलबुत्यावर ते निवडणूक लढवित आहेत.
ललदुहोमांचा परिचय…
ललदुहोमा हे झोराम पीपल्स मुव्हमेंट या पक्षातर्फे निवडणूक रिंगणात असून हेदेखील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. युवकांमध्ये यांची लोकप्रियता अधिक असल्याचे मानले जाते. माजी आयपीएस अधिकारी असणाऱ्या ललदुहोमा यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या कामामध्ये महत्त्वाचे योगदान त्या काळात दिले होते. त्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला. इंदिरा गांधी यांनी ललदुहोमा यांना मिझो अतिरेकी नेते लालदेंगा यांची भेट घेण्यासाठी लंडनला पाठविले होते आणि शांततेसाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. 1987 मध्ये राजीव गांधी यांच्या पंतप्रधान काळात शांततेच्या करारावर लालदेंगा यांनी सही केली होती. 1984 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. पण पार्टीचा व्हिप न बजावल्याने काँग्रेसने त्यांना बडतर्फ केले. 2018 च्या निवडणुकीत ते ऐझवाल पश्चिम 1 आणि सरचिप या मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. ऐझवाल पश्चिमची जागा त्यांनी नंतर सोडून दिली. यंदाच्या निवडणूकीत ते सरचिप मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. 2018 पासून ते झोराम पीपल्स मुव्हमेंट या पक्षाच्या नात्याने निवडणूक लढवित आहेत. पण त्यांचा हा पक्ष नोंदणीकृत नाही. ते सध्याला 74 वर्षाचे असून त्यांच्या पक्षाचे उमेदवार 50 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत.









