20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान आयोजन: नावनोंदणीसाठी 11 नोव्हेंबरपर्यंत मुदत
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गोकुळ श्री स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले आहे. 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान स्पर्धेच आयोजन केले आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंत दुध उत्पादकांनी नावनोंदणी करावी लागणार असल्याची माहिती अध्यक्ष डोंगळे यांनी दिली.
गोकुळतर्फे दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हैशींसाठी ‘गोकुळ श्री‘ स्पर्धा घेण्यात येते. त्यानुसार यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर चेअरमन, सचिव यांच्या सही शिक्क्यानिशी संघाचे बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात 11 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हैस कमीत कमी 12 लिटर प्रतिदिनी व गाय 20 लिटर प्रतिदिनी दूध देणारी असणे आवश्यक आहे. स्पर्धेत म्हैस व गाय गटातून अनुक्रमे प्रथम तीन विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे. दोन्ही गटातील मिळून एकूण सहा विजेत्यांना बक्षीस, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन ‘गोकुळ श्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेची सविस्तर माहिती स्वतंत्र परिपत्रकाने प्राथमिक दूध संस्थांना दिली आहे.
म्हैस गटात प्रथम क्रमांकाला 30 हजार, द्वितीय क्रमांकाला 25 हजार तर तृतीय क्रमांकाला 20 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तर गाय गटात प्रथम क्रमांकाला 25 हजार, द्वितीय क्रमांकाला 20 हजार तर तृतीय क्रमांकाला 15 हजार रुपये बक्षीस आहे.