9 महागड्या रेशमी साड्यांची चोरी, तपासाला वेग
प्रतिनिधी/ बेळगाव
लक्ष विचलित करून नागरिक व दुकानदारांना लुटण्याच्या प्रकाराने बेळगावकर हैराण झाले आहेत. शुक्रवारी दुपारी खडेबाजार येथील एका कापड दुकानातून किमती साड्या पळविणाऱ्या महिला आंध्र किंवा बळ्ळारी परिसरातील असाव्यात, असा संशय व्यक्त करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेजवरून खडेबाजार पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा विरुपाक्षी सिल्क अॅण्ड सारीजचे महेश विरुपाक्षी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडेबाजार पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांचे सहकारी साड्या पळविणाऱ्या महिलांचा शोध घेत आहेत.
पंधरा मिनिटांत साड्या पळविल्या
शुक्रवारी रात्रीपासूनच मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक व इतर ठिकाणी त्यांचा शोध घेण्यात आला. दुपारी 1.20 ते 1.35 या केवळ पंधरा मिनिटांच्या काळात सहा महिला व एक पुरुष अशा सात गुन्हेगारांनी 1 लाख 40 हजाराच्या 9 किमती रेशमी साड्या पळविल्या आहेत. सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. गर्दीचा फायदा घेत दुकानदारांचे लक्ष विचलित करून लुटण्याचे प्रकार वाढले आहेत.
सहा महिला साड्या बघत होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत आलेला पुरुष हा काऊंटरवर उभा होता. त्याने दुकान मालकांना बोलत ठेवले होते. केवळ पंधरा मिनिटांत 9 साड्या पळविल्या तरी कर्मचाऱ्यांना पत्ता लागला नाही. इतक्या सफाईदारपणे त्या महिलांनी आपला कार्यभाग उरकला आहे. या महिला आपापसात तेलगूमध्ये संभाषण करीत होत्या. अधूनमधून मोडक्या हिंदीत त्यांच्यात बोलणे सुरू होते.
लक्ष विचलित करून खासकरून वृद्धांच्या अंगावरील दागिने पळविण्याच्या घटनात इराणी टोळीतील गुन्हेगारांचा सहभाग अधिक असतो. पुढे दंगा सुरू आहे, खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, तुमच्या अंगावरील दागिने सांभाळा, असे सांगत मध्यमवयीन व वृद्ध महिलांच्या अंगावरील दागिने रुमालात बांधून त्यांच्या हातात द्यायचे. थोड्या वेळानंतर संबंधितांनी रुमालाची गाठ खोलल्यानंतर त्यात दागिन्यांऐवजी दगड आढळायचे. आता थेट दुकानात शिरून दुकानदार आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून रोकड, कपडे व इतर साहित्य पळविण्यात येत आहे.
साड्या पळविणाऱ्या महिला आंध्रप्रदेश किंवा बळ्ळारी परिसरातील असण्याचा संशय
देशपांडे गल्ली येथील सुकामेवा दुकानातही असाच प्रकार घडला होता. त्याआधी 30 मे 2023 रोजी मंगळवारपेठ, टिळकवाडी येथील वासंती कोसंदल यांच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने गेलेल्या महिलांनी सहा पैठणी पळविल्या होत्या. महाराष्ट्र, आंध्रप्रदेशसह विविध राज्यात कपडे लांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. खडेबाजार पोलीस या गुन्हेगारी टोळीविषयी माहिती जमवत असून साड्या पळविणाऱ्या महिला आंध्रप्रदेश किंवा बळ्ळारी परिसरातील असाव्यात, असा संशय आहे.









