लाबुशेनचे अर्धशतक, सामनावीर झम्पाचे 3 बळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2023 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 11 चेंडू बाकी ठेवून 33 धावांनी पराभव करत आपला पाचवा विजय नोंदवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने गुणतक्त्यात 10 गुणांसह तिसरे स्थान मिळवले आहे. इंग्लंडला विजयासाठी 287 धावांचे आव्हान दिले आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षटकात 286 धावात आटोपला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव 48.1 षटकात 253 धावात आटोपला.
इंग्लंडच्या डावामध्ये डेविड मलानने 64 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 50, स्टोक्सने 90 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह 64, मोईन अलीने 43 चेंडूत 6 चौकारासह 42, वोक्सने 33 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 32, विलीने 3 चौकारासह 15 तर आदिल रशीदने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियातर्फे झम्पाने 3 तर स्टार्क, हॅझलवूड आणि कमिन्स यांनी प्रत्येकी दोन तसेच स्टोईनिसने एक गडी बाद केला. इंग्लंडने गुणतक्त्यात केवळ 2 गुणासह शेवटचे स्थान मिळवले आहे.
तत्पुर्वी शनिवारच्या सातव्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी बऱ्यापैकी गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 286 धावावर रोखले. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये लाबुशेनने शानदार अर्धशतक (71) झळकवले. ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजांना अधिक धावा जमवता आल्या नाहीत. इंग्लंडच्या वोक्सने 4 तर वूड आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. डावातील दुसऱ्याच षटकात वोक्सने सलामीच्या हेडला रुटकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 11 धावा जमवल्या. या स्पर्धेत फलंदाजी बहरलेल्या वॉर्नरला अधिक धावा जमवता आल्या नाहीत. सहाव्या षटकात वोक्सने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का देताना वॉर्नरला झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमवल्या.
स्मिथ आणि लाबुशेन यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 75 धावांची भागीदारी केली. आदिल रशीदने स्मिथला मोईन अलीकरवी झेलबाद केले. त्याने 52 चेंडूत 3 चौकारासह 44 धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या इंग्लिस रशीदचा दुसरा बळी ठरला. रशीदने इंग्लिशला 3 धावावर बाद केले. लाबुशेनने एका बाजूने संघाची बाजूने सावरण्याचा प्रयत्न केला पण मार्क वूडच्या गोलंदाजीवर तो पायचित झाला. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 33 षटकात 178 धावापर्यंत मजल मारु शकला. लाबुशेन 83 चेंडूत 7 चौकारासह 71 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाचे पहिले अर्धशतक 64 चेंडूत तर शतक 117 चेंडूत फलकावर लागले.
कॅमेरुन ग्रीन आणि स्टोईनिस यांनी सहाव्या गड्यासाठी 45 धावांची भागीदारी केली. विलीच्या गोलंदाजीवर ग्रीनचा त्रिफळा उडाला. त्याने 52 चेंडूत 5 चौकारासह 47 धावा जमवल्या. लिव्हिंगस्टोनने स्टोईनिसला झेलबाद केले. त्याने 32 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 35 धावा जमवल्या. वोक्सने झम्पाला बटलरकरवी झेलबाद केले. झम्पाने 19 चेंडूत 3 चौकारासह 29 धावा जमवल्याने ऑस्ट्रेलियाला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. वोक्सने स्टार्कला 10 धावावर बाद करून ऑस्ट्रेलियावर 49.3 षटकात 286 धावावर रोखले. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या 10 षटकामध्ये 66 धावा जमवताना 5 गडी गमवले. इंग्लंडतर्फे वोक्सने 54 धावात 4 तर वूड आणि रशीद यांनी प्रत्येकी दोन, विली आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 49.3 षटकात सर्वबाद 286 (लाबुशेन 71, स्मिथ 44, ग्रीन 47, स्टोईनिस 35, हेड 11, वॉर्नर 15, कमिन्स 10, स्टार्क 10, झम्पा 29, अवांतर 10, वोक्स 4-54, वूड 2-70, रशीद 2-38, विली 1-48, लिव्हिंगस्टोन 1-42).
इंग्लंड 48.1 षटकात सर्वबाद 253 (मलान 50, स्टोक्स 64, मोईन अली 42, वोक्स 32, विली 15, रशीद 20, झम्पा 3-21, स्टार्क, हॅझलवूड, कमिन्स प्रत्येकी दोन बळी, स्टोईनिस 1-34).









