इंडिया’च्या डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘इंडिया’ आघाडीच्या भवितव्याबाबत उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या नितीशकुमार यांच्याशी फोनवरून चर्चा करत शनिवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संवाद साधला. अलीकडेच एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान नितीशकुमार यांनी काँग्रेसवर निशाणा साधल्याने ते नाराज नसल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली होती.
‘इंडिया’ आघाडीऐवजी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर काँग्रेसचे अधिक लक्ष असून ‘इंडिया’साठी कोणतेही काम केले जात नाही, असे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले होते. यानंतर ‘इंडिया’ आघाडीत चलबिचल वाढल्यानंतर डॅमेज कंट्रोलची कसरत सुरू झाली आहे. नितीशकुमारांच्या नाराजीनंतर विविध पक्षातील बड्या नेत्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव नितीशकुमारांना भेटण्यासाठी पोहोचले होते. सुमारे 40 मिनिटे चर्चा केली. यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोघांमध्ये ‘इंडिया’ आघाडीबाबत चर्चा झाली आहे. मात्र, या फोन कॉलमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.









