ग्रामीण भागातील लोकांना मिळणार काम-रोजगाराची संधी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वित्त मंत्रालयाने ग्रामीण भागात रोजगाराला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सध्या 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी केंद्र सरकारने जारी केला आहे. ग्रामीण भागातील रोजगारात यावषी घट झाल्यामुळे नरेगामध्ये निधी खर्चात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत गरज भागविण्यासाठी अतिरिक्त निधी जारी करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
यावषी ग्रामीण भागात कमी पावसामुळे आणि हळूहळू औद्योगिक सुधारणांमुळे सामान्यत: कामगारांचे शहरांकडे कमी स्थलांतर दिसून आले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात मनरेगा अंतर्गत कामाची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच ठरलेल्या अर्थसंकल्पातील 95 टक्के निधी खर्च झाला. अशा परिस्थितीत निधीची कमतरता लक्षात घेत ग्रामीण विकास मंत्रालयाने निश्चित निधीमध्ये 28,000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त बजेटची तरतूद केली आहे. सध्या सरकारने यातून 10,000 कोटी रुपयांचा निधीही जारी केला आहे.
यंदा कमी पावसामुळे ग्रामीण भागात रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे. यावषी सरकारने मनरेगा अंतर्गत 60,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. हा सर्व निधी आतापर्यंत वितरित झाल्यामुळे मनरेगाची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने 10 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जारी केला आहे. 2024 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत तरतूद करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मोठी कपात केली होती. ती 88,000 कोटींवरून 60,000 कोटी रुपयांवर आणली होती, परंतु गरज पडल्यास सरकार यात वाढ करेल अशी घोषणाही केली होती. त्याप्रमाणे मनरेगा निधीत वाढ करण्याचे जाहीर केले आहे.









