वाकरे प्रतिनिधी
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गतवर्षीच्या उसाला ४०० रुपये आणि यावर्षी 3500 रूपये दर मिळाला पाहीजे य़ा मागणीसाठी जिल्हाभर आंदोलन सुरू आहे. याचाच भाग म्हणून आज उसतोड सुरू केल्याबद्दल व दराचे मिटल्याशिवाय कारखाने सुरू करू नये यासाठी दालमिया,डी.वाय., कुंभी- कासारी साखर कारखान्यांच्या ६ गट कार्यालयाला टाळे ठोकले. या आंदोलनावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. ऊस दराचा तोडगा मिटेपर्यंत कारखाने सुरू करून नयेत अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभी- कासारी परिसर संघटना अध्यक्ष बाजीराव देवाळकर यांच्यासह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोपार्डे येथे ऊसतोड घेतल्याबद्दल शेतकऱ्याला फुल देऊन स्वागत करून ऊस तोड बंद करण्यास विनंती केली. कोपार्डे येथील डी. वाय. पाटील कारखान्याच्या गट ऑफिसवर आंदोलन करून कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर कळंबे येथील कुंभी- कासारी साखर कारखान्या गट ऑफिससमोरही आंदोलन करण्यात येऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऑफिस बंद करून कुलुप लावले.
खुपिरे गट ऑफिसवर आंदोलक आले असता कर्मचारी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून गट टाळे ठोकले.
यानंतर वाकरे येथे दालमिया साखर, दोनवडे येथील कुंभी साखर कारखान्याच्या गट ऑफिस स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून बंद केले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी गत हंगामातील उसाला ४०० रुपये दिलेच पाहीजे. आणि मागील हिशोब झाल्यानंतरच तोडी द्याव्यात अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल. याला कारखाना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी दिला. सर्व गट ऑफिसला कुलूप लावून किल्ली शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घेऊन गेल्याने स्लिपबॉय सह कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बाहेर बसावे लागले.