160 दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कावर चोरट्यांचा डल्ला : दिवसा सुरक्षारक्षक .रात्री सीसीटीव्ही.चोरट्यांनी डीव्हीआर लांबविला
फोंडा : खांडेपार येथील एमआयबीके हायस्कूलात अज्ञात चोरट्यानी रात्रीच्या काळोखात ऑफिसमधून प्रवेश घेत सुमारे रू. 2.80 लाखाची रोकड व सीसीटीव्हीचा डिव्हीआर लांबविल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अज्ञाताविरोधात भां.दं.सं. 454, 457 व 380 कमलाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीम व श्वानपथक घटनास्थळी दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहावी बोर्डच्या परीक्षेसाठी एका विद्यार्थ्याकडून सुमारे रू. 1700 जमा करण्याची प्रक्रिया सद्या स्कूलतर्फे सुरू होती. हायस्कुलात दहावी इयत्तेत प्रत्येक वर्गात 40 विद्यार्थ्याचे एकूण चार वर्ग आहेत. या विद्यार्थ्याकडून परीक्षा शुल्क आकारण्याची प्रक्रिया सुरू होती. एका वर्गाचे शुल्काची रक्कम बॅकेत जमा करण्यात आली होती. मात्र बॅके महिन्याकाठी चारवेळा सुमारे 50 हजार रूपये स्वीकारण्याची अजब निर्बधामुळे विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेली रोकड ऑफिसमधील कपाटात पडून होती. याचा सुगावा चोरट्यांना लागला असावा नेमक्या ऑफिसमधील कपाटेच चोरटयांनी टार्गेट केलेली आहेत यावरून दिसून येते. विद्यालयातर्फे मुख्याध्यापिकेने रितसर तक्रार फोंडा पोलीस स्थानकात केली आहे.
दिवसा सुरक्षारक्षक…रात्री सुरक्षा सीसीटीव्हीवर मात्र चोरट्यानी डीव्हीआरच लांबविले
अज्ञात चोरट्यानी मुख्याध्यपकांच्या कॅबिनला लागून असलेल्या हायस्कूलच्या ऑफिसचे कुलूप तोडून आत प्रवेश घेतला. कारकूनाच्या कपाटातील आतमधील लॉकर तोडून प्रत्येक विद्यार्थ्याकडून रू. 1700 घेतल्यानंतर पाकिटमध्ये सुरक्षितरित्या ठेवलेली रक्कम लंपास करण्यात आली. ऑफिसमधील सर्व कपाटांचे लॉकर तोडण्यात आलेले आहेत. त्dयानंतर चोरट्यांनी आपली छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कुठेच बंदिस्त होऊ नये याची दक्षता घेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरचा शोध घेतला. मुख्याध्यापकांच्या कॅबिनमधील डीव्हीआरचे कनेक्शन तोडून तो लंपास करण्यात आला. हायस्कूलमधील पैसे बॅकेत जमा न केल्याचा पक्का सुगावा लागल्यानंतरच हे कृत्य करण्यात आलेले आहे. येथील परिचयाचा व्यक्तीचा तसेच चोरीच्या कृत्यात दोघांहून जास्त अट्टल चोरट्याचा समावेश असावा असा अंदाज फोंडा पोलिसांनी वर्तविला आहे. हायस्कूलमध्ये दिवसा सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत मात्र रात्रीच्या सुरक्षा पुर्णत: सीसीटीव्हीवर अवलंबूत होती. नेमका याचा फायदा चोरट्यानी घेतला. चोरट्यांनी चोरीचा डाव साधल्यानंतर डीव्हीआर लंपास केल्याने याप्रकरणी चोरीचा छडा लावण्यासाठी फोंडा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. घटनास्थळावरील मोबाईल लोकेशनची पडताळणी सद्या पोलीस करीत आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीमसह श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. तोडलेल्या कुलुपाचे ठसे घेण्यात आले असून उपनिरीक्षक नितेश काणकोणकर अधिक तपास करीत आहे.









