पुढील आठवड्यात बेळगावमधून चाचणी होण्याची शक्यता
बेळगाव : बेंगळूर-बेळगाव वंदेभारत एक्स्प्रेस सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठविल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून चाचपणी सुरू आहे. पुढील आठवड्यात धारवाड ते बेळगाव दरम्यान वंदेभारत एक्स्प्रेसची चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेळगावला लवकरच वंदेभारत एक्स्प्रेस सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जून महिन्यात धारवाड-बेंगळूर दरम्यान वंदेभारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. या एक्स्प्रेसला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळाला. एका दिवसात बेंगळूर ते धारवाड व धारवाड ते बेंगळूर असा प्रवास करता येत असल्याने तिकीट अधिक असूनही आलिशान सुविधांमुळे प्रतिसाद मिळाला. हीच एक्स्प्रेस बेळगावला जोडावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कित्तूर कर्नाटकातील बेळगावकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून बेळगावपर्यंत वंदेभारत सोडण्याची मागणी केली. याबरोबरच राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनीही रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेत बेळगावमधील रेल्वेसेवेला गती देण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन दिवसांपासून वंदेभारतसाठी बेळगावमध्येही हालचाली गतिमान आहेत. धारवाड ते बेळगाव दरम्यान दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळेच पुढील आठवड्यात 8 किंवा 9 नोव्हेंबरला धारवाड ते बेळगाव दरम्यान वंदेभारत एक्स्प्रेसची चाचणीची शक्यता आहे. तशा पद्धतीने नैर्त्रुत्य रेल्वेकडून तयारी सुरू आहे. बेळगावच्या विकासाला या एक्स्प्रेसमुळे गती मिळणार आहे.









