बेळगाव : देशात रेल्वे जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. परंतु, मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने रेल्वे व वीजवितरण कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे धोरण अवलंबले आहे. खासगीकरण झाल्यास त्याचा परिणाम सर्वसामान्य प्रवासी व ग्राहकांवर होणार असल्याने या दोन्ही विभागांचे खासगीकरण थांबवावे, अशी मागणी सीआयटीयु बेळगावतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. देशात रेल्वेचे जाळे विणण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवासी अत्यल्प दरामध्ये देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात प्रवास करू शकतो. सध्या देशात 2300 रेल्वेस्थानकांतून 13 हजार 452 प्रवासी गाड्या धावतात. यातून अब्जावधी लोक प्रवास करतात. याबरोबरीने दररोज 142 अब्ज मेट्रिक टन मालवाहतूक रेल्वेतून होते. खासगीकरण झाल्यास या सर्व वाहतुकीला फटका बसणार असून दरवाढ होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान-राष्ट्रपतींनाही निवेदन
सध्या प्रत्येक राज्यामध्ये वीजवितरण कंपन्या असून त्याद्वारे घरोघरी वीज दिली जाते. परंतु, खासगीकरण झाल्यास विजेच्या दरांवर सरकारचे नियंत्रण असणार नाही. तसेच खासगीकरणामुळे कर्मचारीही रस्त्यावर येतील. त्यामुळे रेल्वे व विद्युत वितरण कंपन्यांचे खासगीकरण थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. याची एक प्रत पंतप्रधान व राष्ट्रपतींनाही पाठविण्यात आली आहे. यावेळी सीआयटीयुचे जिल्हाध्यक्ष जी. एम. जैनेखान, जी. व्ही. कुलकर्णी, मंदा नेवगी, मीनाक्षी धपडे, उल्का सौंदत्ती, सुशीला तळवार, सुषमा रजपूत यासह इतर सदस्य उपस्थित होते.









