चार दिवसांपूर्वी बिबट्याने केला ग्रामस्थांचा पाठलाग : बंदोबस्ताची मागणी
न्हावेली / वार्ताहर
नाणोस, तिरोडा ,गुळदुवे खरीचा स्टॅाप या भागात बिबट्या व पट्टेरी वाघाच्या सततच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ग्रामस्थांबरोबरच विद्यार्थ्यांना देखील जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे. या बिबट्यासह वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी तालुका सचिव मनोज कांबळी यांनी वनविभागाकडे केली आहे.
याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास तिन्हीं गावांच्या ग्रामस्थांना घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशाराही कांबळी यांनी दिला आहे. नाणोस,तिरोडा,गुळदुवे खरीचा स्टॅाप येथे गेल्या महिनाभरातच बिबट्या व पट्टेरी वाघाचा वावर वाढला आहे.ग्रामस्थांना दिवसाढवळ्या दोंन्ही प्राण्यांचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण आहे.या तिंन्ही गावांमध्ये खासगी व वनविभागाचे संरक्षित जंगल असून येथे बिबट्या व पट्टेरी वाघाचा अधिवास आहे.याच जंगल भागात तिरोडा,नाणोस हि गावे वसल्यामुळे ग्रामस्थांना या परिसरातून ये जा करावी लागते.खरीचा स्टॅाप येथे अलीकडच्या काही दिवसामध्ये या दोंन्ही प्राण्यांचा दिवसाढवळ्या मुक्त संचार असतो. त्यामुळे हे दोन्ही प्राणी सर्रास ग्रामस्थांच्या निर्दशनास येतात. सायंकाळच्या वेळी ग्रामस्थांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
चार दिवसांपूर्वी बिबट्याने ग्रामस्थांचा पाठलाग केला होता बिबट्याने पाठलाग केल्याने एका दुचाकीस्वाराचा अपघातही झाला आहे.शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांसाठी येथील प्रवास धोकादायक ठरत आहे. बिबट्या व पट्टेरी वाघाच्या दहशतीमुळे लोक घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत. वनविभागाचे वारंवार लक्ष वेधूनही या प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही.