जिल्ह्यात 98 टक्के लसीकरण पूर्ण : राष्ट्रीय पशुरोग नियंत्रणांतर्गत मोहीम, वेळोवेळी लसीकरण करणे आवश्यक
बेळगाव : जिल्ह्यातील 12 लाख 45 हजार 728 जनावरांना लाळ्या खुरकत प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 27 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत लसीकरणाचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे. जिल्ह्यात 12 लाख 55 हजार 904 जनावरांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 12 लाख 45 हजार 728 जनावरांना लस टोचण्यात आली आहे. गाय, म्हैस, बैल आणि त्यांच्या चार वर्षांवरील वासरांना ही लस देण्यात आली आहे. लाळ्या खुरकत रोगाची जनावरांना लागण झाल्यास जिभेला पुरळ उठून जखमा होतात. आजार बळावल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून खात्यामार्फत दरवर्षी दोन टप्प्यात ही मोहीम राबविली जाते. यंदाच्या वर्षातील दुसऱ्या टप्प्यातील मोहीम पूर्ण झाली आहे.
पशुसंगोपन खात्याच्या पशुवैद्याकडून घरोघरी जाऊन जनावरांना लसीकरण केले जाते. यासाठी पशुसखी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले जाते. अलीकडे जनावरांना लम्पी, लाळ्या खुरकत आणि इतर आजारांची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना फटका बसू लागला आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून खात्याकडून वेळोवेळी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी पशुसंगोपनचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यापैकी 15 लाख गायी, म्हशी आणि बैलांची संख्या आहे. या जनावरांना लाळ्या प्रतिबंधक लसीकरण केले जाते. जून आणि सप्टेंबर अशा दोन टप्प्यात ही मोहीम राबविली जाते. गतवर्षीपासून लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. यासाठी खात्यामार्फत लसीकरण मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जात आहे. काही पशुपालकांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज आहे. लसीकरण केल्यास जनावर दूध देणार नाही, आजारी पडेल अशा गैरसमजुती आहेत. मात्र, लसीकरणापासून वंचित राहिल्यास लाळ्या रोगाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. सर्व जनावरांना वेळोवेळी लसीकरण करणे आवश्यक आहे.
जनावरे निरोगी ठेवण्यासाठी खात्यामार्फत प्रयत्न
जिल्ह्यातील 12 लाख 45 हजार 728 जनावरांना लाळ्या खुरकत प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापयर्तिं 98 टक्के लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, पशुसखी आणि कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे काम पूर्ण केले आहे. जनावरे निरोगी ठेवण्यासाठी खात्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत.
-राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)









