वृत्तसंस्था /पॅरीस
अर्जेंटिनाचा जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेस्सी हा आठव्यांदा ‘बॅलन डी ओर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. महिलांच्या विभागात स्पेनची अॅटेंना बोनमेटी हिला हा पुरस्कार मिळाला. गेल्यावर्षी कत्तारमध्ये झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत मेस्सीने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाला एकतर्फी विजय मिळवून दिला होता. कत्तारच्या स्पर्धेमध्ये त्याने सात गोल नोंदविले त्यामुळे तो या स्पर्धेतील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरला होता. सोमवारी पॅरीसमध्ये हा पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या थाटात साजरा झाला. पॅरीसमधील चॅटेलेट थिएटरमध्ये आयोजिलेल्या या समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते मेस्सीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला. मेस्सीने आतापर्यंत हा पुरस्कार आठ वेळेला मिळविला आहे.
मेस्सी सध्या इंटर मियामीं फुटबॉल क्लबचे प्रतिनिधीत्व करीत आहे. बलून डी ओर हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण अर्जेंटिना फुटबॉल संघाला मिळालेली मौल्यवान भेट असल्याची प्रतिक्रिया मेस्सीने व्यक्त केली. इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू तसेच इंटर मियामी फुटबॉल क्लबचे सहमालक डेव्हिड बेकहॅम यांच्या हस्ते मेस्सीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठेच्या पुरस्कार शर्यतीमध्ये फ्रान्सचा एम्बापे तसेच नॉर्वेचा हेलँड यांचा समावेश होता. नॉर्वेच्या हेलँडने दुसरे तर एम्बापेने तिसरे स्थान पटकावले. कत्तारमध्ये झालेल्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात चुरशीचा झाला. या सामन्यात एम्बापे याने हॅट्ट्रीक साधली. पण पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत विश्वा करंडकावर आपले नाव कोरले. महिलांच्या विभागात फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेन संघातील अॅटेंना बोनमेटीला हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. गेल्या ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्पेनने विजेतेपद पटकावले. या सामन्यात स्पेनच्या विजयामध्ये 25 वर्षीय बोनमेटीचा वाटा महत्त्वाचा ठरला होता.









