वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आयसीसीच्या नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या पुरूषांच्या वनडे गोलंदाजांच्या ताजा मानांकन यादीत पाकचा आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच अग्रस्थान पटकावले आहे. त्याचा क्रिकेट प्रवास अनेक चढउताराचे मिश्रण ठरले आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या वनडे गोलंदाजांच्या ताजा मानांकन यादीत आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज हॅजलवूडला पहिल्या स्थानावरून खाली खेचत अग्रस्थान काबीज केले. आफ्रिदी यापूर्वी या मानांकन यादीत आठव्या स्थानावर होता. त्याचे स्थान सात अंकांनी वधारले आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याने दर्जेदार गोलंदाजी करताना 23 डावात 3 गडी बाद केले. तसेच त्याने या सामन्यात वनडे क्रिकेटमधील आपले बळींचे शतक 51 व्या सामन्यात साजरे केले. क्रिकेटच्या वनडे प्रकारात बळींचे शतक जलद कालावधीत नोंदविणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शाहिन आफ्रिदी तिसऱ्या स्थानावर आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आफ्रिदीने सर्वाधिक म्हणजे सात सामन्यातून 19.93 धावांच्या सरासरीने 16 गडी बाद केले असून त्याने ऑस्ट्रेलियाच्या अॅडॅम झंपाशी बरोबरी केली आहे. आफ्रिदीने या स्पर्धेत एका डावात 5 गडी बाद केले आहेत. वनडे गोलंदाजांच्या ताजा मानांकन यादीत भारतचा मोहम्मद सिराज तिसऱ्या तर कुलदीप यादव सातव्या स्थानावर आहे. वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत पाकचा कर्णधार बाबर आझम पहिल्या, भारताचे शुभमन गिल दुसऱ्या, रोहित शर्मा पाचव्या तर विराट कोहली सातव्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या मानांकन यादीत बांगलादेशचा शकीब अल हसन पहिल्या स्थानावर असून भारताचा हार्दिक पांड्या 11 व्या तर रविंद्र जडेजा 13 व्या आणि पाकचा शदाब खान 20 व्या स्थानावर आहेत.









