वृत्तसंस्था /ताश्कंद
एएफसी ऑलिंपिक पात्र फेरीच्या महिलांच्या फुटबॉल स्पर्धेतील भारताचे आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. बुधवारी येथे झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात उझ्बेकिस्तानने भारताचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या पात्र फेरीच्या स्पर्धेत चार संघांच्या गटामध्ये भारतीय महिला संघाने यापूर्वीच्या सामन्यात जपान आणि व्हिएतनाम संघांकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या स्पर्धेत चार संघांच्या गटामध्ये बुधवारचा सामना जिंकल्यास उझ्बेकिस्तान आपले दुसरे स्थान निश्चित करेल असे समीकरण होते. भारतीय महिला फुटबॉल संघ केवळ औपचारिकता म्हणून बुधवारच्या सामन्यात खेळत होता. या सामन्यात उझ्बेकने दुसऱ्याच मिनिटाला आपले खाते उघडले. त्यांच्या लूडमिलाने दिलेल्या पासवर डिभोरेकोनने हेडरद्वारे गोल नोंदविला. 51 व्या मिनिटाला उझ्बेकचा दुसरा गोल कॅरेचीकने केला. सामना संपण्यास 5 मिनिटे बाकी असताना कॅरेचीकने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदवून भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.









