लालू यादव, राबडीदेवी, तेजस्वी यादव यांना मोठा दिलासा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लँड फॉर जॉब प्रकरणी गुरुवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. यावेळी आरोपींच्या वतीने सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राशी संबंधित अनेक कागदपत्रे आपल्याला मिळालेली नाहीत, असा दावा करण्यात आला. त्यामुळे आता पुढील सुनावणी 29 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असल्याने लँड फॉर जॉब प्रकरणात आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, खासदार मीसा भारती आणि इतरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वीच्या सुनावणीतच लालू यादव कुटुंबासह इतरांना 50 हजार ऊपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्मयावर जामीन मंजूर करण्यात आला होता.
राऊस एव्हेन्यू न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपींनी आरोपपत्र छाननीसाठी वेळ मागितल्यामुळे पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला निश्चित करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी सीबीआयला आरोपपत्राशी संबंधित सर्व कागदपत्रे आरोपींना लवकरच उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
सीबीआयने 18 मे 2022 रोजी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी, मुलगी आणि इतरांविऊद्ध नोकरीच्या नावावर जमीन घेऊन आर्थिक फायदा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी 2004 ते 2009 दरम्यान तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे खात्यातील डी ग्रुपमध्ये नियुक्तीच्या बदल्यात त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे जमिनीचा फायदा घेतला होता, असा सीबीआयचा आरोप आहे. या प्रकरणात लालू यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव 4 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयात हजर झाले. त्यानंतरच त्यांना जामीन देऊन दिलासा दिल्यामुळे यावेळी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागले नाही. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे.









