दिल्लीत एका मार्ग अपघातात उगवता चित्रफित निर्माता आणि मुक्त छायाचित्रकार पियुष पाल याचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारचे अपघात आपल्या देशात नेहमी कोठे ना कोठे होत असतात. प्रतिवर्ष साधारणत: दीड लाख लोक अशा मार्ग अपघातांमध्ये जीव गमावतात, असे आकडेवारी सांगते. हे अपघात आणि त्यांच्यात इतक्या मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू ही राष्ट्रीय शोकांतिका असते. पण असे अपघात झाल्यानंतर या अपघातांपेक्षाही एक भयानक, तसेच कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला यातना देईल असा प्रकार अनेकदा घडतो. तो म्हणजे अपघातात सापडलेल्यांना साहाय्य करण्यास कोणीच पुढे येत नाहीत. अपघात झाल्यानंतर बघ्यांची गर्दी जमते. शिवाय अनेक लोक तेथूनच जात येत असतात. बघे आपल्या मोबाईलवर या प्रसंगाचे चित्रण करण्यात, तसेच सेल्फी घेण्यात मग्न राहतात. पण एक माणूस म्हणून अपघातग्रस्ताला साहाय्य करावे, त्याला लवकरात लवकर रुग्णालयात न्यावे, तो शुद्धीत असेल तर त्याची विचारपूस करुन त्याला धीर द्यावा, अशी महत्वाची कामे कोणीही करत नाहीत. जणू काही एक मनोरंजनाचा कार्यक्रम चालला आहे, अशा प्रकारे बघ्यांची आणि जाणाऱ्या येणाऱ्यांची वर्तणूक असते. ही अनास्था अस्वस्थ करणारी आहे. अलीकडच्या काळात उठल्या सुटल्या मानवतेच्या नावाने गळे काढण्याची फॅशन रुढ झाली आहे. या विषयावर अहोरात्र चर्चासत्रे, वादविवाद आणि लेखन चालते. असे लेखन करणारे, किंवा चर्चासत्रे चालविणारे, तसेच त्यात भाग घेणारे मान्यवरही असा प्रसंग उद्भवल्यावर आपलाच उपदेश आपण आचरणात आणताना दिसून येत नाहीत, तेथे सर्वसामान्य माणसे तरी वेगळी कशी वागतील? पण ही अनास्था मनाचा थरकाप उडविणारी आहे. गुरुवारीच सकाळी दिल्लीत घडलेल्या पियुष पाल याच्या अपघाताने हे सुन्न करणारे वास्तव पुन्हा समोर आले आहे. या अपघाताचे जे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, त्यानुसार अपघात झाल्यानंतर जवळपास अर्धातास तो मार्गावरच रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता. असंख्य लोक या कालावधीत त्याच्या जवळून गेले. अनेक लोक त्याच्याभोवती जमले. पण कोणीही त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जबर जखमा झाल्या होत्या. त्याला वेळेवर कोणीही पुढे होऊन रुग्णालयात नेले असते, तर कदाचित त्याचा जीव वाचण्याची शक्यता होती. याहीपेक्षा क्रूरतेचा कळस म्हणजे तो पडल्यानंतर त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप कोणीतरी चोरला. त्याचे घरातून त्याला याच काळात फोन आला होता. पण फोन चोरणाऱ्याने कॉल कट केला. नंतर मोबाईल स्वीच ऑफ केला. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच हा प्रकार. हे सर्व वाचल्यानंतर कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकल्याखेरीज राहणार नाही. समाजात इतकी अनास्था का निर्माण झाली आहे, या प्रश्नाचे उत्तर मिळणेही कठीण झाले आहे. केवळ आपल्यापुरते पाहणे आणि अन्य कोणासाठीही कसलाही त्रास न घेणे हे आपल्या समाजाचे वैशिष्ट्या बनत चालले आहे असे वाटल्याशिवाय रहात नाही. असे प्रकार पूर्वी घडत नव्हते असे नाही. पण अलीकडच्या काळात ते फार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अपघातग्रस्ताला वेळेवर लोकांचे साहाय्य मिळाले तर तो खूपच भाग्यवान ठरला असे म्हणण्याची वेळ आली आहे. अपघातग्रस्ताला स्वत: पुढे होऊन साहाय्य करायचे नसेल तर नसो, पण निदान त्वरित पोलिसांना कळवून ते वेळेवर अपघातस्थळी पोहचतील अशी व्यवस्था तरी बघे लोक करु शकतात. मोबाईलवरुन चित्रण करण्यापेक्षा निदान एवढी हालचाल करणे तरी महत्त्वाचे नाही काय? पण तेही करण्याची कोणाची इच्छा दिसत नाही. छोट्या शहरांमध्ये परिस्थिती त्या मानाने बरी असल्याचे दिसून येते. निदान कोणीना कोणी पुढे येऊन साहाय्य करताना दिसते. पण महानगरांमध्ये मात्र स्थिती भयावह आहे. असे आपले का झाले आहे, हे खरोखरच अनाकलनीय आहे. ज्या समाजाची साहाय्यता आपण आपल्यासाठी पदोपदी घेतो, त्याच समाजातील एक व्यक्ती संकटात असताना लोक इतका कोडगेपणा कसा दाखवू शकतात, हे एक कोडेच आहे. पूर्वीच्या काळात अपघातग्रस्ताला साहाय्य केल्यास साहाय्य करणाऱ्यावरच ‘मेडिको लीगल केस’ रहदारी पोलिसांकडून दाखल करण्याचे प्रकार घडत असत. त्या भीतीपोटी लोक साहाय्य करण्यास पुढे येत नसत. त्यामुळे अनेक सजग व्यक्तींनी याविरोधात जोरदार आवाज उठविला होता. त्यामुळे सरकारला कायद्यात काही परिवर्तन करावे लागले होते. आता अपघातग्रस्ताला साहाय्य केले तर उलट अशा व्यक्तीचा सन्मान केला जातो. त्याचे कौतुक होते. कायदेशीर सोपस्कारांपेक्षा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे, हे आता प्रशासनालाही पटले आहे. तरीही कोणी साहाय्याचा हात पुढे करीत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे. या परिस्थितीत खरोखच मोठे परिवर्तन घडण्याची आवश्यकता आहे. शालेय शिक्षणात यासंबंधीचे धडे देऊन नव्या पिढीची मानसिकता तशा दृष्टीने निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्या समाजात आजही घरातून होणाऱ्या संस्कारांचे महत्त्व टिकून आहे. अपघातग्रस्ताला किंवा अचानकपणे संकटात सापडलेल्या अनोळखी व्यक्तीला साहाय्य करण्याची मानसिकता घरातच शिकविली गेली तर हे परिवर्तन घडू शकते. असे साहाय्य केल्यास साहाय्यकर्त्याला कोणत्याही कायदेशीर समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही, असा विश्वास प्रशासनानेही निर्माण करण्याची आवश्यकता आहे. खरे तर प्रशासनाकडून असे प्रयत्न केले जातात. पण आजही लोकांच्या मनात स्वत:लाच त्रास होईल की काय, अशी भीती आहे. ती सोडण्याची आवश्यकता आहे. माणूस म्हणून जगताना अशा स्थितीत तरी आपली उपयुक्तता सिद्ध करणे आवश्यक आहे. पण हे लक्षात केव्हा घेतले जाईल, हाच प्रश्न आहे.
Previous Articleव्याघ्र प्रकल्पाची पन्नाशी
Next Article तरुण भारत सेमीफायनल निवडणूक ३ नोव्हेंबर २०२३
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








