तिमाहीमधील आकडेवारी सादर : विक्रीतही जोरदार वाढ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2023 मध्ये कोका कोला इंडियाचा निव्वळ नफा 722.44 कोटी रुपये होता. बिझनेस इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म टॉफलरच्या आर्थिक डाटावरून ही माहिती प्राप्त झाली आहे. कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2022 मध्ये 460.35 कोटी रुपये होता, त्या तुलनेत पाहता नफा 56.9 टक्क्यांनी वाढला आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 4,521 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली आहे, जी मागील आर्थिक वर्षातील 3,121 कोटी रुपयांच्या विक्रीपेक्षा 44.9 टक्क्यांनी अधिक आहे. परवडणाऱ्या किंमती आणि ग्रामीण भागात वाढलेली मागणी यामुळे विक्रीत वाढ दिसली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठांवर विशेष लक्ष केंद्रित करत तेथील व्यापार व्यवसाय वाढीसाठी कंपनी सध्या व आगामी काळात प्रयत्न करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, ‘आमची उत्पादने आता 45 लाख स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. जागतिक महामारी कोरोनाच्यावेळी उत्पादने 28 लाखांहून अधिक स्टोअर्समध्ये होती. ‘सणासुदीच्या काळात मजबूत मागणी आणि ग्राहकांशी अधिक संलग्नता सुनिश्चित करण्यासाठी ही योजना असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यासाठी त्यांनी आपल्या जाहिराती आणि विपणन खर्चात वाढ केली आहे.









