वृत्तसंस्था/ मुंबई
भारत आज गुरुवारी येथे होणार असलेल्या विश्वचषकाच्या लढतीत श्रीलंकेचा सामना करणार आहे. एप्रिल, 2011 मध्ये श्रीलंकेला हरवूनच भारताने विश्वचषक जिंकला होता. मात्र त्यावेळचा श्रीलंकेचा संघ आता राहिलेला नसून आज होणारी लढत ही दोन भारी फरक असलेल्या संघांमधील लढाई असेल. भारताने आतापर्यंत तिसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने अतुलनीय वाटचाल केली आहे, तर श्रीलंकेने जितके सामने जिंकले आहेत त्यापेक्षा जास्त त्यांना पराभव पत्करावे लागलेले आहेत.

भारत सहा सामने अपराजित राहिलेला असून भारताचा आत्मविश्वास निर्विवादपणे उच्च स्तरावर आहे. हार्दिक पंड्याची अनुपस्थिती भरून काढून संतुलन साधून पाहणाऱ्या भारताला मोहम्मद शमी विलक्षण लाभदायी ठरला आहे. त्याने केवळ दोन सामन्यांमध्ये 9 बळी मिळविले आहेत. परंतु कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील ‘थिंक टँक’ला माहीत आहे की, ‘स्पेशल शमी’ला पुढील मोठ्या लढतींच्या दृष्टीने जपून वापरले पाहिजे. त्याचप्रमाणे लीग टप्प्यातील उर्वरित आव्हानांना तोंड देण्यासाठी जसप्रीत बुमराह देखील ताजातवाना राहणे आवश्यक आहे.
फलंदाजीत शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना या स्पर्धेमध्ये जोरदार मजल मारता आलेली नाही. गिलला सुऊवातीचे दोन सामने गमवावे लागले आणि परत आल्यापासून त्याला फक्त एकच अर्धशतक नोंदविता आलेले आहे. आखूड टप्प्याच्या चेंडूंविरुद्धची ज्याची कमजोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे त्या अय्यरलाही मोठ्या खेळीची आवश्यकता आहे. त्याला आतापर्यंत सहा सामन्यांत फक्त एकच अर्धशतक नोंदवता आले आहे. मात्र आज घरच्या मैदानावर विश्वचषकातील सामना खेळत असल्याकारणाने त्याला अतिरिक्त प्रेरणा मिळू शकेल.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर या स्थानिक खेळाडूंची स्थितीही अशीच असेल. विश्वचषकात एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 66.33 च्या सरासरीने रोहितने 398 धावा केलेल्या असून भारतीय फलंदाजांत तो आघाडीवर आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना त्याला निश्चितच आणखी स्फुरण चढेल. श्रीलंकेचा संघ पात्रता फेरीतील सुरुवातीच्या उत्कृष्ट प्रदर्शनानंतर या विश्वचषकात अनेकदा कमी पडलेला आहे. दुखापती आणि महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपलब्धतेने या संघाला अडचणीत टाकले आहे.
सदीरा समरविक्रमाने सहा सामन्यांत 331 धावा केल्या असून श्रीलंकेचा तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या वर्षी एक हजाराहून अधिक एकदिवसीय धावा करणारा गिलनंतरचा दुसरा फलंदाज असलेल्या पथुम निसांकानेही चांगली कामगिरी केली आहे. विश्वचषक स्पर्धेतील सलग चार अर्धशतकांमुळे तो लक्षवेधी ठरला आहे. त्याशिवाय आंजेलो मॅथ्यूज परत येऊन त्याने सामना जिंकून देणारी कामगिरी केलेली असली, तरी श्रीलंकेचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून कर्णधार कुसल मेंडिसचेच नाव घ्यावे लागेल. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अधिक अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीचा विचार करता चांगली कामगिरी केली आहे. परंतु मजबूत भारतीय फलंदाजीविऊद्ध ते कितपत प्रभावी ठरतील याविषयी शंका आहे.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या.
श्रीलंका : कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल पेरेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ कऊणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डिसिल्वा, महीश थीक्षाना, दुनिथ वेललागे, कसून रजिथा, आंजेलो मॅथ्यूज, दिलशान मदुशंका, दुशन हेमंथा, चमिका करुणारत्ने.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









