वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिवाळीच्या मुहूर्तावर आप सरकारने सफाई कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आप सरकारने एमसीडीच्या पाच हजार कंत्राटी स्वच्छता कामगारांना सेवेत कायम केले आहे. या कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासून नोकरी कायम करण्याची मागणी होत होती. स्वच्छता कामगारांची मागणी पूर्ण करत आम्ही आमचे वचन पूर्ण केल्याचे दिल्लीतील जनतेचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत एमसीडीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम केल्याबाबत माहिती दिली. दिल्ली महापालिकेत गेली 15 वर्षे भाजपचे सरकार आहे. भाजपने सफाई कर्मचाऱ्यांचे शोषण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांना कायम करावे, अशी मागणी सफाई कर्मचाऱ्यांनी नेहमीच केली. आपल्या सरकारने ती प्रक्रिया पुढे नेली आहे, असे ते म्हणाले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होऊन केवळ दीड वर्ष झाले आहे. या दीड वर्षात आम्ही सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांना कायम केले आहे. यावरून आम आदमी पक्षाची बांधिलकी दिसून येते, असेही ते म्हणाले.









