संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप, अनेक अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडमध्ये (एसएफसी) तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या मेजरला सेवेतून बडतर्फ केले आहे. उच्चस्तरीय तपासणीत संबंधित मेजर राष्ट्रीय सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे संरक्षण आणि सुरक्षा आस्थापनातील सूत्रांनी सांगितले. लष्करी कायदा 1950 अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून मेजरच्या सेवा समाप्त करण्याच्या आदेशावर नुकतीच राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली.
लष्कराने मार्च 2022 मध्ये मेजरच्या आक्षेपार्ह कृतींबद्दल चौकशी सुरू केली होती. संवेदनशील माहिती बाळगणे आणि शेअर करणे यासह संशयास्पद क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्याचा मेजरवरील आरोप तपासात सत्य असल्याचे आढळले. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत असलेल्या एका सोशल मीडियावरील ग्रुप अॅडमिनशी मेजरचे निकटचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेजरच्या मोबाईलमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्या अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत.
मेजरव्यतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा प्रोटोकॉलच्या संभाव्य उल्लंघनासाठी ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यासह सुमारे 18 संरक्षण कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. हे सर्वजण ‘पटियाला पेग’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य होते. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मेजरचाही समावेश होता. लष्कर पुढील काही आठवड्यात या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई देखील करू शकते.
गेल्या वर्षभरापासून मेजर निलंबित
मेजरवर गंभीर आरोप समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांचे मंडळ नेमण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मेजरला गेल्यावषी निलंबित करण्यात आले होते. निलंबनानंतर त्याला उत्तर भारतातील एसएफसी युनिटमध्ये पोस्ट करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या मध्यात बडतर्फ करण्यासंबंधी आदेश जारी करण्यात आला होता. आता राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर त्यासंबंधी अधिसूचना काढण्यात आली.









